'एससी ' च्या ७५ विद्यार्थ्यांना विद्यावेतनसह मार्गदर्शन
३० नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठात अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर /२४ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला असून या अंतर्गत आता विद्यापीठात बार्टीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होणार झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.
अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणाकरिता एक स्वतंत्र केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या.
यावेळी बार्टीच्या स्नेहल भोसले व आरती भोसले या उपस्थित होत्या. सदर परीक्षा केंद्र व प्रशिक्षणामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनून बँक, रेल्वे आदी प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बार्टीच्या या प्रशिक्षण केंद्रात एकूण ७५ उमेदवारांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. सहा महिने कालावधी असलेल्या या बॅचमध्ये तज्ञांकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन बार्टीकडून अदा केले जाणार आहे.
यासाठी, ३० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तात्काळ अर्ज करावेत. काही अडचण असल्यास बार्टी केंद्र समन्वयक डॉ. विकास कडू (8788686019) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले आहे.
फोटो ओळी :
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत सामाजिक करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे, स्नेहल भोसले व आरती भोसले छायाचित्र दिसत आहेत.