Type Here to Get Search Results !

कासेगांवसह परिसराला अवकाळी मुसळधार पावसाचा तडाखा


कासेगांव/संजय पवार 

: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावसह परिसराला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने जणू झोडपले. संपूर्ण पावसाळा पावसानं पाठ फिरवली. त्यामुळे शिवार, शिवारातील विहिरी नदी-नाले कोरडे राहिले. अशातच मंगळवारी सायंकाळी आभाळात काळकुट्ट ढग दाटून आलं, सांजवेळी वादळ-वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाट पावसाला प्रारंभ झाला. शिवारात आलेला हा पाऊस पहिला पाऊस म्हणून गणला गेला. संपूर्ण पावसाळ्यात कोरडे राहिलेले ओढे-नाले या पावसाने भिजले. अवकाळी पावसानं कांदा, द्राक्षे यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. 


थेंब-थेंब पाणी शेती अन् मातीला लाख मोलाचा ! या लाख मोलाच्या पावसाच्या थेंबाची शेतकरी आणि शिवाराच्या मातीनं संपूर्ण खरीप हंगामात डोळ्यात प्राण आणत वाट पाहिली, पण पदरी निराशाचं आली. यंदाच्या पावसाळ्यात पावसानं पाठ फिरवली, आलाच तर मातीतलं पाणी बांधापर्यंत आलं नाही. अशा बिकट परिस्थितीत खरीपाचा हंगाम संपला. खरीपाची पिक पावसाअभावी करपली.

पुन्हा तो येईल, पुन्हा तो येईल अशा भाबड्या आशेने रब्बीचा हंगाम सुरू झाला. ओलावा असो अथवा नसो, काळ्या आईची ओटी भरायची, अशा भावनेने 'बळी' राजानं ज्वारी, हरभरा गहू व अन्य पिकांच्या पेरण्या उरकल्या, रान कुठे उगवलं तर कुठं काळचं राहिलं, नकदी पिकं म्हणून पाहिली जाणारी ऊस, द्राक्ष कांदा अशी पिकं विहिरीच्या वा विंधन विहिरीच्या थोड्याफार पाण्यावर जगविण्याची राजाची धडपड सुरू होती. 

मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे ऐन हिवाळ्यात, पावसाळा अनुभवता आला. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात सध्या अवकाळी पाऊस पडला. काल सायंकाळपासून रात्री झालेल्य पावसाने शिवार चिंब-चिंब भिजलं. गावातील लेंडी- नाला आणि गांव ओढ्याला पहिल्यांदा पाणी आले, मात्र मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने शिवाराला झोपल्याने रब्बी पिके, द्राक्ष आणि कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

अवकाळी पावसाने सध्या भेडसावणारी पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. दुष्काळी झळाची चाहूल लागलेल्या कासेगांव शिवाराला अवकाळी पाऊस गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना थोड्या अंशी दिलासादायक  असला तरी कांदा द्राक्ष या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून तून व्यक्त होत आहे. शासनाने त्वरीत पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, नुकसान भरपाई करण्याची मागणी या भागातील परिसरातून होत आहे.