Type Here to Get Search Results !

मानधानवाढीसह इतर मागण्यांसाठी पोलीस पाटील करणार उपोषण


सोलापूर : राज्यातील पोलीस पाटलांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून पोलीस पाटलांची मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यातील मौजे आंबे चिंचोली गावचे पोलीस पाटील विजय मुकुंद वाघमारे मंगळवारी, १४ नोव्हेंबरपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.


पोलीस पाटील हा गावस्तरावरील महत्वाचा घटक असून शासन आणि गाव यामधील समन्वयाचे काम चोखपणे पोलीस पाटील पार पाडतात. आजच्या या महागाईच्या काळात पोलीस पाटील हे अल्प मानधनावर काम करीत आहेत. मानधन दर महिन्याला वीस हजार रुपये मिळावे, नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे, पोलीस पाटलांचा प्रवास भत्ता दुप्पट करण्यात यावा, वयोमर्यादा वाढविण्यात यावी, निवृत्ती समयी वीस लाख रुपये देण्यात यावेत. अशा मागण्या घेऊन विजय वाघमारे हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस पाटील हे पद शासन प्रशासन व जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. गावामध्ये कायदा, सुव्यवस्था, जातीय सलोखा राखणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणे, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनजागृती करीत ती यशस्वी करणे. स्थानिक पातळीवर विकासकामात येणारे अडथळे दूर करणे, अवैध धंद्याना प्रतिबंध करणे, गावातील सण उत्सव शांततेत पार पाडणे, आरोपींचा ठाव-ठिकाणा कळवून त्यास पकडून देण्यास पोलीसांना मदत करणे, रोगराई महामारीच्या काळात खबरदारी घेत मदतकार्य करणे, ज्यांच्यामुळे गावात कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. 

अशांची गुप्त माहिती संबंधित अधिकारी प्रशासनाला देणे, गृह, महसुल, वने, सहकार, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामविकास सामान्य प्रशासन विभागासह अन्य विभागातील कामकाजाशी संबंधित राहून कामे करावी लागतात.पोलीस पाटील हे पद स्थानिक असल्यामुळे गावात २४ तास सतर्क राहावे लागते, अशा शब्दात वाघमारे यांनी पोलीस पाटील यांच्यावरील जबाबदाऱ्यांची जाणिव करून दिलीय.