Type Here to Get Search Results !

पाण्याच्या वादाचा शेवट; प्राणघातक हल्ल्यात पाटील मृत्यूमुखी

सोलापूर : विहिरीवर पाणी देण्याच्या कारणावरून आपसात झालेल्या वादात झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमीस येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी घोषित केले. नरसप्पा बाबुराव पाटील (वय -४२ वर्षे) असं मृताचं नांव आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील सराटी इथं सोमवारी घडलीय.

मौजे सराटी येथे सोमवारी सकाळी पूर्व वैमनस्य त्यातच भर म्हणून शेतातील विहिरीच्या पाणी देण्याच्या कारणावरून, नरसप्पा बाबुराव पाटील (राहणार - सराटी) यांच्यावर नवनाथ अप्पाराव पाटील यांनी कोयत्याने पाठीमागून डोकीवर, चेहऱ्यावर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात नरसप्पा पाटील गंभीररित्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. हे कळताच, भाऊ पंडित पाटील व पुतण्या रमेश पंडित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.


उभयतांनी जखमीस उपचारासाठी अणदूर येथील रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालय बंद असल्याने जखमीवर तेथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यानंतर जखमीस सोलापुरातील शासकीय रुग्णालयात करण्यात दाखल केले, मात्र जखमीचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस जोपर्यंत गुन्हेगाराला ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने हॉस्पिटल परिसरात गोंधळाला वातावरण दिसून आले.