Type Here to Get Search Results !

ताडी दुकाने वाढवून आणखी किती गरिबांचे जीव घेणार ? कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांचा सवाल


सोलापूर : उत्पादन शुल्क अधीक्षक सोलापूर विभागामार्फत अलीकडेच नवीन शासनमान्य ताडी दुकानांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे परवानगी देण्याचे सुरू केले आहे, ही प्रक्रिया ताबडतोब बंद करण्यात यावी तसेच नवीन दिलेले परवाने त्वरित रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सोलापूर शहर व जिल्ह्यात सन २०२१-२२ साली मोठ्या प्रमाणात शासनमान्य ताडी दुकाने चालू करण्यात आली. या ताडी दुकानांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला, इतकेच नव्हे तर शहरातील अनेक दुकाने बंद करा, म्हणून महिला वर्ग रस्त्यावर उतरले. जोपर्यंत ताडी दुकाने बंद करत नाही, तोपर्यंत महिलानी आंदोलन सुरूच ठेवले. महिलांच्या या ताडी दुकान विरोधाला अनेक संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, कामगार संघटना, सामाजिक संघटना अशा सर्व स्तरातून महिलांच्या ताडी आंदोलनाला पाठिंबा मिळाला.

यामध्ये अनेक ताडी दुकानाच्या परिसरातील रहिवासी यांची सहमती घेतल्याविना दुकानांना परवानगी दिली त्यामुळे अनेक दुकाने विरोधामुळे बंद करण्यात आले. न्यू पाच्छा पेठ अशोक चौक परिसरातील ताडी दुकान लायसन्स क्रमांक १०/सन २०-२२ या दुकानात दिनांक २०/०१/२०२३ रोजी साईबाबा दस्तगीर म्हेत्रे नामक कामगाराचे दुकानातच ताडी पिऊन निधन झाले. त्यानंतर ते दुकान सील करण्यात आले.

भवानी पेठ घोंगडे वस्ती येथे विषारी ताडी तयार करण्याचा अड्डा आहे, अशी माहिती मिळाल्यावरून उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात विषारी ताडी बनविण्याचे रासायनिक द्रव्य आणि पावडर मिळाली. या छाप्यातील सापडलेले आरोपी हे परवानाधारक ताडी दुकानांचे मालक आहेत. ते विषारी ताडी बनविणारे ताडी माफिया आहेत, असे असताना नवीन ताडी दुकानांना परवाना देणे, म्हणजे गरिबांचे जीव घेण्यासाठीच हे परवाने दिल्यासारखे होईल, म्हणून सरकार अजून किती जीव मारणार असा सवाल कारमपुरी महाराज व उपस्थित महिला कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. नवीन दुकानांना निविदा परवाना त्वरित बंद करा, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा अडकी, श्रीनिवास बोगा, नागमनी भंडारी, स्वाती शिंदे, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी होते.