'या' शासकीय रुग्णालयात २४ तासात तब्बल २४ जणांचा मृत्यू ; मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

shivrajya patra
नांदेड : नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी आहे. 

रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. 

नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू केवळ योगायोग नक्कीच नाहीत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे.

पण ठाण्याच्या घटनेच्या वेळी दाखविलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळी देखील दिसतेय. लपवाछपवी सुरु असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्षाची बाब दिसत असून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करुन राज्याच्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलं असून याखेरीज या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देखील मिळायला हवी. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना आणि मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !असंही त्यांनी त्यात लिहिलं आहे.

वृत्त निवेदन

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर २०२३ ते दि. ०१ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ प्रौढ रुग्ण (०५ पुरुष, ०७ महिला) व १२ बालक रुग्ण होते. प्रौढ रुग्णांमध्ये ०४ हृदयविकार, ०१ विषबाधा, ०१ जठरव्याधी, ०२ किडनी व्याधी, ०१ प्रसती गुंतागुंत, ०३ अपघात व इतर आजार याप्रमाणे व बालकांपैकी ०४ अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून संदर्भित झाले होते.

रुग्णालयात अत्यावश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी रु. १२ कोटी निधी देण्यात आला असून आणखी रु. ०४ कोटी निधी मंजूर झाला आहे. गेल्या दोन दिवसांत अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्हयातून व बाहेरुन जास्त प्रमाणात आले आहेत. डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेवून आहेत. अनेक वर्षांपासून सदरचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. दाखल असलेल्या इतर रुग्णांना आवश्यक तो औषधोपचार केला जात आहे, असं निवेदन शासकीय रुग्णालयाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे सोमवारी सायंकाळी पाठविले आहे.


To Top