सोलापूर : बँकेवर दरोडा घालण्याकरीता निघालेली इंटरनॅशनल गॅंग (आंतरराष्ट्रीय टोळी) गजाआड करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या
लोकल क्राईम ब्रँचला (स्थानिक गुन्हे शाखा) यश आलं आहे. या टोळीची गॅस कटरच्या सहाय्याने बँक, ज्वेलर्स शॉप फोडण्याची विशिष्ठ पद्धत होती. या टोळीतील सराईत १३ आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ६, ४२, ७७० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले.
माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस या बँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१,१६,४४७ रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी माळशिरस पोलिसांकडे १८ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळास भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे तीन पथके तयार करून त्यांनी गुन्ह्यातील आरोपीतांची माहिती प्राप्त केली. गॅस कटरच्या सहाय्याने भिंत फोडून बँकेत चोरी करण्याची पध्दत झारखंड येथील आरोपी ठिकठिकाणी वापरतात, असे तपासात लक्षात आले होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा देखील झारखंड येथील आरोपीतांनी केला असल्याचे समजले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील साहेबगंज व पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यातून ०२ आरोपींना ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी हे नेपाळ, बांगलादेशमध्ये पळून गेल्यामुळे मिळून येत नव्हते.
१० ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, झारखंड व नेपाळ येथील आरोपी हे लातूर येथील बँकेवर दरोडा टाकण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे यांनी सोलापूर -तुळजापूर महामार्गावरील मौजे उळे गांवच्या हद्दीत सापळा रचून अत्यंत शिताफीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या ०५ आरोपींना दरोड्याच्या साहित्य व वाहनासह ताब्यात घेतले.
याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात, भादविसंक ३९९ प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात इतर ०८ आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले.
या गुन्ह्याच्या तपासात सपोनि शशिकांत शेळके यांनी ०३ आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी उदगीर लातूर येथून ०५ आरोपीतांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील, पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यातील तसेच नेपाळ या देशातील आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी देशाच्या विविध भागात गॅस कटरच्या सहाय्याने बँक फोडीसारखे गंभीर गुन्हे केले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले, असल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या गुन्ह्यात १३ आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना, १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत.
आरोपीतांचे ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी व बँक फोडण्यासाठी लागणारे मोठे गॅस सिलेंडर, गॅस कटर, मोठे स्क्रू ड्रायव्हर, कटावण्या, लोखंडी काणस, हातोडे, लोखंडी पहार, दोरी, कोयते इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या आरोपींनी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील विविध भागात गुन्हे केल्याचा पोलिसांचा कयास असून त्याबाबत माहिती घेण्यात येत असल्याची पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी शेवटी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सफौ ख्वाजा मुजावर, शिवाजी घोळवे, मनोहर माने, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार बापू शिंदे, आबा मुंडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, सलिम बागवान, मोहन मनसावाले, विजय भरले, रवि माने, पोना धनराज गायकवाड, चालक समीर शेख, पोशि अजय वाघमारे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, दिलीप थोरात, युसुफ पठाण, अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे यांनी बजावली.
.......... चौकट ........
राज्या-परराज्यातील गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी
अटकेतील या आरोपीतांकडे सखोल चौकशी करता, ०४ आरोपीतांचा माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यातील आरोपी हे वाकड, पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय गुरनं ६५१ / २०२३ भादविसंक ३९५, ३९८, ३०७ इत्यादी सह आर्म अॅक्ट ४, २५ व तेलंगना राज्यातील सुजातानगर पोलीस ठाणे गुरनं ८३ / २०२३ भादविसंक ४५७, ३८० प्रमाणे दाखल पुण्यातील पाहिजे आरोपी आहेत.
....... चौकट ..........
... हे आहेत आरोपी
सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ६१७/२०२३ भादविसंक ३९९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींची नांवे :
१) इनामुल उर्फ मिथुन कुशाबोर शेख वय ३८ वर्षे रा. पैगम टोला, पियारपुर, थाना- राधानगर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड.
२) मुरसलिम शेख हाफीजुल शेख वय २७ वर्षे रा. हरमल्ली थाना- राजमहल, पोस्ट जामनगर, जि. साहेबगंज, राज्य -झारखंड.
३) सुरज आलम नजीरउलहक वय - ३३ वर्षे रा. सुस्तानी बांदापुखुर पोस्ट- मालदा, राज्य पश्चिम बंगाल.
४) राज बहादुर कामी चंद्र बहादुर कामी (चालक), वय -३२ वर्षे
५) दिपक बहादुर डिल्ली दमाई वय - ३५ वर्षे दोघे रा. कोलमुडा, थाना- गोदावरी जिल्हा कैलाली, नेपाळ, सध्या राहणार अंबाली, अंधेरी वेस्ट, मुंबई.
६) मो. कमरूद्दीन उर्फ कमरू मो. आसु शेख, वय-३६ वर्षे, रा. तापुतोला दियारा, पोस्ट पलसगच्छी, जि. साहेबगंज राज्य झारखंड.
७) एनजामुल हक सनाउल्ला शेख, वय- २८ वर्षे रा. माणिकपाडा, पोस्ट गगन पहाडी, थना पाकुड, राज्य झारखंड.
८) मो. कमलुद्दीन सहाजुल, वय ३७ वर्षे, रा. औरंगाबाद थाना, सुती जि. मुर्सीदाबाद, राज्य पश्चिम बंगाल.
९) सिबासिंग देओल गुमानसिंग देओल, वय ४० वर्षे, रा. सिलगडी, पोस्ट डोटी, थाना, जिल्हा डोटी, देश नेपाळ.
१०) भिम विश्वकर्मा मान विश्वकर्मा, वय ३३ वर्षे, रा. स्वारकटान, थाना अत्तरिया, जि. कैलाली, देश नेपाळ.
११) टिकाराम गौरव कोली, वय २९ वर्षे, रा. नारीकोला, थाना सिलगडी, जि. डोटी, देश नेपाळ.,
१२) दिप विक्रमसिंग नेगी भानसिंग नेगी, वय ४४ वर्षे, रा. मालुबेला थाना, गुलरिया, जि. कंचनपुर देश नेपाळ.
१३) भरतसाऊद हर्कसाऊद, वय ४२ वर्षे, रा. गुलरिया, थाना व पोस्ट गुलरिया जि .कंचनपूर देश नेपाळ.