दुचाकीवर हेल्मेट तसेच चार चाकी वाहनात सीट बेल्ट लावल्यास जीवित हानी टाळण्यास मोलाची मदत : स. पो. नि. विजय गायकवाड

shivrajya patra
सोलापूर : सुरक्षिततेसाठी आवश्यक हेल्मेट वा सीट बेल्ट न लावण्यातील मानवी अनास्था आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष हे अपघातास कारणीभूत असतात. प्रत्येकाने दुचाकी चालविताना आपल्या सुरक्षिततेसाठी डोईवर हेल्मेट लावणे तसेच चार चाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. ही चांगली सवय लावून घेतल्यास अपघातात होणारी संभाव्य जीवित हानी टाळता येण्यास मोलाची मदत होते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी केले.

ते सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे हगलूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटे आणि पोलीस हवालदार अविनाश चव्हाण उपस्थित होते.

नवरात्र महोत्सव, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी तुळजापूरकडे पायी निघणाऱ्या भक्त भाविकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शासन प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतातच, त्यातूनही लहान-मोठी दुर्घटना घडल्यास, त्यांना तातडीने मदत मिळणे अपेक्षित असते. या मार्गावरील ग्रामस्थांनी गरजूंसाठी मृत्युंजय दूत म्हणून मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी केले. 

देशात वा महाराष्ट्रात अन्य अपराधी कृत्यातील मृत्यू संख्येपेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. माणसांनी वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाती मृत्यू नियंत्रणात आणता येतात. त्यासाठी दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेटचा वापर टाळणे, मद्याच्या अंमलाखाली वाहन चालविणे व सीट बेल्ट न लावणे या वाईट सवयी म्हणून पाहिल्या पाहिजेत, त्यात सकारात्मक बदल करतानाचा प्रारंभ स्वतःपासून झाला तर अपघातांवर नियंत्रण येणे शक्य असल्याचा विश्वास  सपोनि गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला. 

त्यानंतर सपोनि विजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटे आणि पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, उळेगांव ग्रामस्थांच्या समवेत राष्ट्रीय महामार्गावरील उळेगांव येथील संभाव्य अपघातास निमंत्रण देणाऱ्या पूलाचीही पाहणी केली.
To Top