प्रभु श्रीरामाच्या सानिध्यातील व्यक्तीरेखा विवेक घळसासी उलगडणार
सोलापूर/२९ ऑक्टोबर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन आयोजित दिवाळीपूर्व 'विवेकाची अमृतवाणी' शुक्रवारी, ०३ ते ०५ नोव्हेंबर या दरम्यान लोकमान्य टिळक सभागृह चार पुतळा समोर (हि.ने. वाचलनालय अॅम्फी थिएटर) येथे दररोज सकाळी ०६.२५ वाजता होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्यवाह प्रशांत बडवे यांनी दिली.
यंदाचे हे तेरावे वर्ष असून तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सोलापूकरांना ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या विचारांची मेजवानी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्स यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
हिंदू धर्मातील मोठा आणि पवित्र अशा दिवाळीची पहाट चांगल्या मंगलमय विचाराने सुरू व्हावी, म्हणून गेल्या १३ वर्षापासून सुरू असलेल्या " विवेकाची अमृतवाणी " च्या माध्यमातून ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, सीता माता, महाबली हनुमान, नारदभक्ती, चाण्नय अशा अनेक व्यक्तीरेखांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या वर्षी प्रभु श्रीराम आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीरेखांवर विचार मांडणार आहेत. पहिल्या दिवशी शुक्रवारी, ०३ नोव्हेंबर रोजी श्रीराम स्नेही-निषादराज, दुसऱ्या दिवशी शनिवारी, ०४ नोव्हेंबर रोजी श्रीराम सेवक-केवट तर समारोपाच्या दिवशी रविवारी, ०५ नोव्हेंबर रोजी श्रीरामभक्त-शबरी यांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
भक्ती, स्नेह आणि सेवा या तिहेरी संगमातून यंदाच्या ''विवेकाची अमृतवाणी'' मधून विचारांची मेजवाणी घेता येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु.ना.गाडगीळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोफत सर्वासाठी खुला असणार असून वेळेवर सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सुरू होवून ०७.३० वाजता संपणार आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने आणि वेळेवर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे यांनी केले.