एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून द्या, मराठा समाजाला आरक्षण : आमदार बबनराव शिंदे

shivrajya patra
सोलापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला व संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत, राज्य सरकारला एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी केली. आम्ही सदैव मराठा समाजाच्या व मनोज जरांगे-पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहू, असे आश्वासनही आमदार शिंदे यांनी यावेळी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यामाने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी भेट दिली. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होते.

यावेळी सकल मराठा समाज जिल्हा समन्वयक माऊली पवार व इतर सकल मराठा बांधव व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देणारे आमदार बबनराव शिंदे हे जिल्ह्यातील पहिले लोकप्रतिनिधी आहेत, असे माऊली पवार यांनी सांगितले , सर्व सकल मराठा बांधवांनी त्यांच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान आमदार शिंदे यांचे चिरंजीव विक्रमसिंह बबनराव शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणकर्ते संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेऊन माढा पंचायत समिती यांच्यावतीने मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा घोषित केला असून अशा आशयाचे पत्र विक्रमसिंह शिंदे यांनी उपोषणकर्ते जरांगे -पाटील यांना दिले.
To Top