आदरणीय बापू,
भारतवासीयांनी तुला बापू म्हणून संबोधले, संपूर्ण जगात तू बापू म्हणून प्रसिद्ध झालास, अहिंसेचा पुजारी बलाढ्य अशा इंग्रजी साम्राज्यासमोर तू उभा ठाकलास. धोती, पंचा अशा वेशात भारतातील इंग्रजी सत्तेला हादरवून सोडलंस 'चिमूटभर मीठ' उचलून मिठाचा सत्याग्रह तू केलास 'सविनय कायदेभंग चळवळ' संपूर्ण देशात उभी राहिली, 'चाले जाव, छोडो भारत' हे महाआंदोलन तू उभे केलेस, ब्रिटिश साम्राज्याशी पुढे तू नि:शस्त्रपणे लढलास !
स्वातंत्र्यलढा... तू या देशातील सर्व सामान्य जनतेला घेऊन उभा केलेस. ब्रिटिश साम्राज्यशाहीला तू सुरुंग लावलास ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडलेस,साऱ्या विश्वावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्य शाहीने तुझ्या नि:शस्त्र लढ्यापुढे व निर्धारापुढे गुडघे टेकले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत भूमीवरील १५० वर्षाच्या इंग्रजी राजवटीचा अस्त झाला, स्वतंत्र भारताच्या आकाशात तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. बापू, तू स्वराज्याचे स्वप्न पहिले होतेस, स्वराज्य कसे सुराज्य होईल, याचीच तुला चिंता होती, परंतु तुझ्या इच्छेला नथुराम रुपी हैवानाने गोळ्यांचा वर्षाव करून पायबंद घातला.
तुझी हत्या म्हणजेच अहिंसेची हत्या, तुझी हत्या म्हणजेच सर्व सामान्य भारतीयांच्या इच्छा अपेक्षांची हत्या ! बापू, तू बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्य शाहीशी नि:शस्त्रपणे लढलास, तू अहिंसेचा पुजारी मात्र तुझी हत्या गोळ्या घालून शस्त्राद्वारे करण्यात आली, सर्व जगाने पाहिले कि, नि:शस्त्र बापूने बलाढ्य अशा इंग्रजी साम्राज्य शाहीला भारतातून हुसकावून लावले, त्याच महामानव बापूची हत्या शस्त्राद्वारे केली गेली.
बापू तुझी हत्या करणारा आणि ही हत्या घडवून आणणारी जमात आजही भारतभर सक्रिय आहे, आता तर ती जमात फारच आक्रमक रूप घेऊन जाती-धर्माच्या नावावर या महान भारत देशात हैदोस घालत आहे. बापू, काही वर्षांपूर्वी तुझ्या आश्रमाचा साबरमती किनारा जातीय दंगलीने पेटला होता. अनेक माता-भगिनींची अब्रू वेशीवर टांगण्यात आली होती निष्पाप व निरागस बालकांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. बापू, तू दिलेला अहिंसेचा आम्हास आता पूर्णपणे विसर पडलेला आहे. आम्ही आता हिंस्त्र श्वापदाला ही लाजवणारी हिंसा दिवसागणिक करत आहोत. बापू, गोध्रा पेटला आणि ज्या साबरमतीने तुझ्यासारख्या संत महात्म्याला पाहिले होते, त्याच साबरमतीचा किनारा निर्दोष निष्पाप लोकांच्या रक्तांनी लाल झालेला संपूर्ण जगाने पाहिला.
बापू, आजही देशात जातीय तणाव निर्माण करून स्वतःच्या स्वार्थापोटी भारत देशाला बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. तू आम्हाला दिलेली अहिंसेची शिकवण आम्ही केव्हाच विसरलो आहोत, तुझ्या हत्त्येपासून सुरु झालेली हिंसा दिवसेंदिवस वाढत आहे, जातीय दंगली, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, हुंडाबळी या सर्वानी देश पोखरला आहे. देशाच्या एकता, अखंडतेलाच सुरुंग लावण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहेत. बापू तू दिलेलं स्वातंत्र्य तू पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न दुर्दैवाने आज भंग होऊ पाहत आहे. बापू, गोध्रा आज जळत आहे, साबरमती आज अश्रू ढाळत आहे.
बापू तुझ्या स्वप्नांचे तुकडे होताना पाहून मनाला फारच वेदना होत आहेत, खिन्न सुन्न मनाने हे गाऱ्हाणं तुझ्या पुढे मांडत आहे. बापू आम्हाला क्षमा कर ! तू नि:शस्रपणे लढलास... आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेस, मात्र त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना, आम्ही एकमेकांसमोर तलवारी, त्रिशुळ, भाले, बंदुका, पिस्तुले, कट्टे घेऊन मरणाचे स्वप्न पाहण्याकरिता उभे ठाकले आहोत. जातीय अग्नींनी भारत मातेला ग्रासले आहे. तुझ्यावर झालेला गोळ्यांचा वर्षाव आजही सुरु आहे. नथुरामाची औलाद आज डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सारख्यांची निर्धास्तपणे हत्या करत आहेत.
बापू, नाही म्हणायला भारतवासीयांनी खूप प्रगती केली, खूप क्रांती केली. देश घडविण्याकरिता नव्हे आमच्या प्रगती पुस्तकाची सुरुवात आम्ही लोकांची घरे-दारे पेटवून बेचिराख करून टाकली. त्यात आणखी प्रगतीकडे झेप घेऊन दंगली पेटविल्या. माता-भगिनींची अब्रू वेशीवर टांगली. सरणाला लाकडे कमी पडू लागली, म्हणून बापू, आम्ही जिवंत हाडा-मासांच्या माणसांना पेटवू लागलो. पेटलेली जिवंत माणसांच्या आर्त किंकाळ्यांचा आसुरी आनंद आम्ही सध्या घेत आहोत.
बापू, आमचे प्रगती पुस्तक तुझ्याकडे सादर करत आहे. त्यात मानवता, सत्य, अहिंसा यांना आम्ही केव्हाच मारून गाडून टाकलेले आहे. आमचे प्रगती पुस्तक जातीय दंगलींनी, स्त्रियांवरील बलात्कारांनी, राष्ट्रीय संपत्तीची राख रांगोळी केलेली, भ्रष्टाचारांनी बरबटलेली असा १०१ टक्के गुण मिळवणारी आहे. बापू, आज तुमच्या नावाने अनेक बापू बनून भारत मातेच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. बापू, आमचे प्रगती पुस्तक अव्वल दर्जाचे झालेले आहे. ते पाहून नक्कीच तुला वाईट वाटेल ...
आम्हाला क्षमा कर !
तुझाच -
शिवश्री मुझफ्फरभाई सय्यद,
(कार्याध्यक्ष-अखिल भारतीय साहित्य कलामंच)
९९६०३२५०५७