सोलापूर : नियोजित महेशगौरी पोलीस गृहनिर्माण संस्था, ही सोसायटी ३४ एकर जागेवर पसरलेली आहे. त्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ३५० सभासद संख्या आहे. सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवेच्या चौकटीबाहेरच विश्व पाहता येत नाही. अशातही पोलीसांचं हक्काचं घर साकारण्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त महेशगौरी यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी काढले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील केगांव येथील तुळशीदास जाधव सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित नियोजित महेशगौरी पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या नामफलकाचे उद्घाटन सोमवारी, ०२ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख बोलत होते.
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी आणलेली शोभीवंत फुलांची व सावलीची झाडांचे मुख्य रस्त्याच्या व अंतर्गत रस्त्यांच्यामध्ये रोपण करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्षारोपण केल्याने आनंदमय भविष्यासाठी चांगली बाब असल्याचेही आमदार देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रारंभी इंजिनिअर भगवान जाधव, अशोककुमार दिलपाक, मधुकर जाधव यांनी सदर सोसायटीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
तत्कालीन पोलीस आयुक्त महेशगौरी यांच्या संकल्पानुसार त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरासाठी, त्यांच्या फंडाचे पैसे तीन टप्प्यात घेऊन ३४ एकर क्षेत्र गृहनिर्माण सोसायटीसाठी खरेदी केले होते. त्यानंतर ही सोसायटी जवळपास कागदोपत्रीच राहिली होती. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक दिलपाक यांनी जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ प्रयत्नशील राहून सभासदांचे वा त्यांच्या वारसांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळतील, अशा सर्वांच्या संपर्कात जाऊन केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून गृहनिर्माण सोसायटीच्या नाम फलकाकडे पाहिले गेले, हेही महत्त्वाचे आहे.
यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत कांबळे, पोलीस निरिक्षक श्रीमती संगीता हत्ती, मीरा पाटील, रवि हारकुड, पांडुरंग जाधव, विजय पगारे, नवाज गवंडी, दिगंबर जाधव, अमोल पाटील, गंगाधर जोगधनकर, सूत्रसंचालन श्रीमती मिनाक्षी पेठे यांनी केले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.