' चिमू आणि पिल्लू मला माफ करा ... !' अधिकाऱ्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या वेदना

shivrajya patra
सोलापूर : 'चिमू आणि पिल्लू मला माफ करा, मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की, माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू मला माफ कर... ही वाक्यं एखाद्या चित्रपटाचा संवाद नाही तर वास्तवातला कुटुंबकर्ता अथवा बाप म्हणून परिस्थितीपुढं हात टेकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधील वेदना आहेत.

कामाचा ताण व वरिष्ठांचा आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद प्रकाश मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना शनिवारी, पहाटे घडलीय. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाकडे . त्यांच्या शवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, नातेवाईकांनी 
दुपारपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचे सांगण्यात आले.

आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. 

नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले आनंद प्रकाश मळाळे यांना कुंटूर पोलीस ठाण्याचा पदभार देऊन परतीच्या वाटेवर असतांना, झालेल्या दुर्घटनेत चेहऱ्यावरील उजव्या बाजूचा जबडा फॅक्टर झाला होता. मळाळे यांनी आतापर्यंत २५ वर्ष शासनाची इमाने-इतबारे सेवा बजावलेली असून पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झाल्यापासून त्यांच्या बाबतीत अनेक उलट-सुलट गोष्टी घडत असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.

 ती चिठ्ठी जणू त्यांच्या ४७ वर्षाच्या जीवनपटाचा उलगडा करण्यास पुरेसा आहे. त्यांनी कुटुंबाइतकीच इच्छा बॅचमेट पुढं व्यक्त केलीय... त्यांनी म्हटलंय, 'माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.' हे ऋण व्यक्त करण्यापूर्वी त्यांनी  'माझे पश्चात माझी पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये, ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे.' अशी अखेरची इच्छा व्यक्त केलीय.

बिलोली पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आल्यावर वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीय दृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या बाबतीत सातत्याने घडत आहेत, अशी त्यांची धारणा होती.

त्यावेळी वरिष्ठांकडून मदत देणे बाजूला राहिले, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा दिरंगाई आरोपीला मदत होईल, असे कार्य केले, म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून त्यांना ज्ञाप किंवा कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात येत आहेत. तेही नैराश्याचे कारण होते, असं त्यांचं म्हणणे होते.  ही घटना पोलीस वर्तुळात खळबळजनक आहे. सपोनि आनंद मळाळे यांची एक्झिट सामान्य मनाला ' शॉक ' देणारीच आहे. त्यांच्या जाण्याने अनेक प्रश्न उभे केले आहेत, त्यासाठी ती सुसाईड नोट पुरेशी आहे. अशा दुर्दैवी घटनांकडे मायबाप शासनाने गंभीरतेने पाहणे आता अगत्याचे ठरले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

.................

घडलेली घटना खूपच वाईट 

घडलेली घटना खूपच वाईट आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही संकटावर उत्तर मिळू शकते. कुटुंबीयांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सहकारी मित्रांची चर्चा केली असती तर आज आनंद मळाळे यांच्यासोबत ही घटना घडली नसती. जीवनात प्रत्येक माणसाला कामाचा ताण, टेन्शन आहेच. प्रत्येकाने सकारात्मक राहून आयुष्य जगणे आवश्यक आहे.
- राजू मोरे,
सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर.
To Top