सोलापूर : शिक्षक हा ज्ञानाचा दाता व संस्कृतीचा निर्माता आहे. म्हणून शिक्षक मोठा आहे. या शिक्षकांना कंत्राटी करून गुलाम बनवू नका. सरकारने शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी खाजगीकरणाच्या प्रस्तावामुळे त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील. मुलांचे शिक्षण थांबेल. त्यामुळे शासनाने खाजगीकरणाचा प्रस्ताव रद्द करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकडे सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे. असे विचार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले.
त्या महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी शिवस्मारक सभागृहात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या की, शिक्षण हा मुलांना मिळालेला मूलभूत अधिकार असून तो हिराववण्याचा सरकारने प्रयत्न करू नये. शैक्षणिक क्षेत्र उत्पन्नाचे साधन नसून त्यातून देशाचे सक्षम नागरिक घडतात हे सरकारने लक्षात घ्यावे. म्हणून शिक्षक व पत्रकारांनी बोललं पाहिजे तरच ही लोकशाही जिवंत राहील. शाळा टिकतील अन्यथा शाळा बंद पडतील आणि आजची शिक्षकांची पिढी शेवटची पिढी ठरेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
अध्यक्षस्थनावरून बोलताना समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की, सकारात्मक विचार पेरत शिक्षक व कर्मचारी यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात संघटना खंबीरपणे उभी आहे. ठेकेदारामार्फत कंत्राटी भरतीला संघटना प्रखरपणे विरोध करील.
यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, जैन गुरुकुल प्रशालेचे प्राचार्य आशुतोष शहा, प्राचार्य उज्ज्वला साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभामंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर, महासंघाचे राज्यसरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, बाळासाहेब डोळसे, राज्य संघटक अशोक पाचकुडवे, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हा सचिव रवी देवकर, दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन जिल्हा सेक्रेटरी रवि देवकर यांनी करून घेतले. सत्कारमूर्तींच्या वतीने शिवाजी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. याच समारंभात संघटनेचे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या समारंभाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद भालशंकर, प्रा.अभिजीत भंडारे, सत्यवान पाचकुडवे, आसिफ कंदलगावकर, शुभम इंगळे, सुरेश कोरे, इरफान शेख आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार
संजय आठवले- दै. सुराज्य मोहोळ तालुका प्रतिनिधी
अमोल साळुंके - दै. पुढारी सोलापूर शहर रिपोर्टर
क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार-
बशीर बागवान ( प्राचार्य) नागनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज, मोहोळ
मनोहर इंगवले - (मुख्याध्यापक) - श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी, सांगोला
नितीन गायकवाड - (मुख्याध्यापक)- सावित्री कन्या प्रशाला रानमसले, ता.सोलापूर
शिवाजी जगताप- ( सहशिक्षक) सिद्धेश्वर विद्यालय यावली, ता. मोहोळ
रतन शिवशरण- ( उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथवाडी ता. पंढरपूर
सतीश वडवराव - ( सहशिक्षक) - शाहू हायस्कूल, मानेगाव (धा.) ता. बार्शी
युवराज सावंत - ( उपशिक्षक)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोलवाडी केंद्र आंधळगाव ता. मंगळवेढा
बसवराज गायकवाड - ( उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा वागदरी ता. अक्कलकोट
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार
प्रज्ञा वाघमारे- ( मुख्याध्यापिका)- सौ. हि. ने. न.शाह कन्या प्रशाला, बार्शी
शोभा मारकड - (सहशिक्षिका)- पांडुरंग विद्यालय, कटफळ, ता. माळशिरस
राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार
किसन कांबळे- (वरिष्ठ लिपिक)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व महात्मा जोतिबा फुले उच्च माध्यमिक विज्ञान व कला महाविद्यालय, नगरपालिका कुर्डूवाडी ता. माढा
सोमनाथ साळुंखे - (कनिष्ठ लिपिक) साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, अंत्रोळी ता. द. सोलापूर
नानासाहेब भालशंकर - ( प्रयोगशाळा परिचर) - शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, कुंभारगाव ता. करमाळा
संजय गडदे- ( सेवक)- लाल बहादूर शास्त्री, हायस्कूल सोलापूर
या १६ गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले.