सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ अठरा टक्के सिंचन क्षेत्र आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी, सोडविणे गरजेचे आहे. आपण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीना-भीमा जोड कालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत. भविष्यात तालुक्यातील शेतीला आणि पिण्यास पाणी कमी पडू नये, यासाठी आपण अनेक योजना राबविणार आहोत वडकबाळ येथील नवीन बंधारा हे एक वर्षाच्या आत पूर्ण करून शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ आणि तालुका सुजलाम सुफलाम करू, अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
वडकबाळ येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून सहा कोटी खर्चातून येथील सीना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा नवीन त्याचा बंधारा मंजूर करण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी देशमुख बोलत होते.
यावेळी मंचावर रामप्पा चिवडशेट्टी, डाॅ. चनगोंडा हविनाळे, अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, हनुमंत कुलकर्णी, मळसिध्द मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, संगप्पा केरके, अधिकारी संजय कदम, घोडके, वडकबाळचे उपसरपंच राहुल पुजारी, अप्पासाहेब मोटे, विलास राठोड, राजकुमार व्हनमाने, प्रदीप केरे, सतीश पुजारी, सुर्यकांत पुजारी, संतोष पवार आदी उपस्थित होते.
वडकबाळ येथील नदीकाठी घाट तयार केला आहे, येथे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येईल. वडकबाळ बंधारा एक वर्षात पूर्ण करणार आहोत. या बंधारामुळे वडकबाळ येथे ७५ हेक्टर वांगी ८५ हेक्टर, हत्तूर येथे १९० हेक्टर समशापूर येथे ४९ हेक्टर असे २९९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, असा उल्लेख करून आमदार देशमुख पुढे म्हणाले, त्यामुळे या भागाचे चित्र बदलणार आहे, आजूबाजूच्या कुपनलिकेला पाण्याचे स्त्रोत वाढणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये बंदलगी येथे नवीन बंधारा आपण मंजूर करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या सत्तर वर्षात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तालुक्याचा विकास केला नाही. तालुक्यातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक यासह इतर प्रश्न सोडवले नाहीत. तालुका सगळ्याच बाबतीमध्ये वंचित कसा राहील, याची काळजी त्यांनी घेतली. फक्त हे करा ते करा अशी मागणी करतात, मात्र त्यासाठी शासन दरबारी त्यांनी कधीच साधा एक कागद देऊन पाठपुरावा केला नाही, आजवर केवळ जनतेची दिशाभूल तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली आहे, असे सांगताना आमदार देशमुख यांनी विरोधकावर टीकास्त्र सोडले.
सत्ता असूनही त्यांना तालुक्याचा विकास करता आला नाही, परिणामी दक्षिण सोलापूर विकासापासून कोसो मैल दूर होता. आपण आमदार झाल्यावर गेल्या नऊ वर्षात तालुक्यामध्ये कोट्यावधीचे विकास कामे केली आहेत. तालुक्यातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवित आहोत, असेही देशमुख यांनी म्हटले.
सीना-भीमा जोड कालवा
सीना-भीमा नदीवर नवीन बंधारे व्हावेत, त्यासाठी
शासन दरबारी प्रयत्नशील आहोत, ही दोन्ही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. येणाऱ्या काळामध्ये आणखीन विकास कामे करून दक्षिण सोलापूर तालुका राज्यातच विकासाचे मॉडेल बनवू, अशी ग्वाही त्यांनी शेवटी बोलताना दिली.वडकबाळचा नवीन बंधारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधणार आहे, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.