सोलापूर : विष्णुबुवा चक्रांकित महाराजांचे दुःखद निधनाने भागवत संप्रदायाची मोठी हानी झाल्याचे सोलापुरातील त्यांचे निकटवर्तीय ह.भ. प. अवि गोडबोले ह्यांनी शोक व्यक्त केला आहे. वंदनीय वै. भाऊ थावरे ह्यांचे आग्रहावरून भागवत कथेसाठीसाठी महाराज सोलापूरला येत असत, या आठवणीला गोडबोले ह्यांनी जागे करताना सांगितले.
थोर भागवत कथाकार, आळंदी येथील ज्ञानेश्वर माउली मंदिरात कीर्तन सेवेचा मान असणारे वंदनीय कीर्तनकार ह.भ.प. विष्णुबुवा चक्रांकित महाराज (वय ९०) ह्यांचे काल रात्री दहा वाजता आळंदी येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
माउलींच्या प्रस्थान सोहळ्यानंतर, माउली पुन्हा आळंदीत परत येईपर्यंत ह.भ.प. विष्णुबुवा चक्रांकित महाराजांना माउली मंदिरात कीर्तन सेवा रुजू करण्याचा मान होता. ही परंपरा पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी सांभाळली होती. माउलींची सेवा करायला मिळाली, हा मोठा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता.
एक सेवाभावी, ज्ञानी, विनयशील माउली भक्त हरपल्याची खंत भाविकांकडून व्यक्त होत आहे. वै. विष्णुबुवा चक्रांकित महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं संजीव प्र. कुसुरकर (पुणे) यांनी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.