सोलापूर : गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध व्हावा, या भावनेने तिची माऊली पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहे. तिच्या मनाचं दुःख समजून घ्यायला संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे उसंत नसल्याचे तिला पदोपदी जाणवले आहे. या प्रश्नी शिवसेना उपनेत्या अस्मिता सुरेश गायकवाड यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना निवेदन देऊन, त्या मुलीचा शोध होऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अशा एक नाही तर अनेक मुली जिल्ह्यातून बेपत्ता आहेत. त्यातील ही एक मुलगी असून, ती बेपत्ता झाल्यावर संबंधित पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आले. त्या मुलीचा आज ना उद्या शोध होऊन तिचा पत्ता लागेल, या भावनेतून तिची आई पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहे, मात्र संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहिले नसल्याने तिचा शोध लागत नसल्याचे दिसून आले आहे.
त्या पोलीस स्टेशनकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला बंदोबस्त आहे, तुमची एकच केस नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ती मुलगी हल्ली पुण्यात आहे, अशी माहिती तिच्या पालकांना माहिती मिळाली आहे.
आदरणीय,
शिरीष सरदेशपांडे,
पोलीस अधीक्षक, सोलापूर, यांसी
सस्नेह जय महाराष्ट्र,
महोदय,
सोलापूर जिल्ह्यातील अनेक मुली व महिला बेपत्ता असून त्यांचा शोध लागत नाहीये. अशातच अल्पवयीन पंधरा वर्षाची मुलगी गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहे. तिची आई वारंवार पोलीस चौकीत विचारणा करण्यासाठी जात असते. मुलीला शोधण्यासाठी ती जिवाचं रान करीत आहे.
आपण, संबंधितांना आदेश देऊन ताबडतोब त्या मुलीचा शोध घेऊन गुन्हेगारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील अन्य बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी त्वरित ॲक्शन प्लॅन तयार करून त्याप्रमाणे तातडीने मोहीम हाती घेऊन त्या मुलींच्या पालकांना दिलासा द्यावा, असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मंगल थोरात, मीनल दास, प्रीती नायर, मीना सुरवसे, प्रभावती येलगुंडे, पूजा चव्हाण, रत्नमाला बागलेकर, शमीम पठाण आदी महिला उपस्थित होते.