सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या १४ गुन्ह्यात ३१९० लिटर हातभट्टी दारु व २२, ८००लिटर रसायन असा ०६, ८१, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने मंगळवारी अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षीहिप्परगा तांड्यातील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बक्षीहिप्परगे गावाच्या पश्चिमेस इर्शाळ वस्तीवर बालाजी बाळू जाधव (वय- ३० वर्षे) या इसमाच्या ताब्यातून पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या १६ रबरी ट्यूबमधील १, १२० लिटर हातभट्टी दारु जप्त केली.
सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सिताराम तांडा येथे एका पत्र्याच्या शेडमधून ४, ०० लिटर रसायन व १० रबरी ट्यूबमध्ये ठेवलेली १, ००० लिटर हातभट्टी दारु असा ५८ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला. फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सेवा तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता, त्याठिकाणी १, ८०० लिटर रसायन ताब्यात घेऊन जागीच नाश करण्यात आले. भरारी पथक, अ विभाग, ब विभाग व सीमा तपासणी नाका पथकाने संयुक्तपणे मुळेगाव तांड्यामध्ये छापे टाकून निलेश तोळाराम राठोड (वय-४२ वर्षे) याच्या राहत्या घरातून ४, ८० लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच अनिता संजय राठोड (वय- ४२ वर्षे) या महिलेच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्या ठिकाणी ०३ रबरी ट्यूबमध्ये २,४० लिटर हातभट्टी दारु मिळून आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला.
निरिक्षक ब विभागाच्या पथकाने श्रीनाथ सुरेश राठोड ( वय - ३० वर्षे) याच्या घरातून तीन रबरी ट्यूबमधील २४० लिटर हातभट्टी व १, २०० लिटर रसायन जप्त केले. एका अन्य कारवाईत भरारी पथकाने रेश्मा श्रीकांत राठोड (वय - ३० वर्षे) या महिलेच्या राहत्या घरातून ८० लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मुळेगाव तांडा परिसरातील ०६ हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून १८, ९०० लिटर गुळमिश्रित रसायन जागीच नाश केले.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक करमाळा विनायक जगताप यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह सोगांव (ता. करमाळा) येथे नंदू भागवत काळे (वय - ४९ वर्षे) याच्या ताब्यातून पाचशे लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारु जप्त केली. मंगळवारी राबविलेल्या हातभट्टी मोहिमेत विभागाने १४ गुन्ह्यात ०६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण २२, ८०० लिटर रसायन व ३, १९० लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून ०६, ८१, ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, राहूल बांगर, दुय्यम निरिक्षक रोहिणी गुरव, अक्षय भरते, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, वसंत राठोड, अमित गायकवाड, इस्माईल गोडीकट, अण्णा कर्चे, आनंदराव दशवंत, चेतन व्हनगुंटी, योगीराज तोग्गी व वाहनचालक रशिद शेख यांनी पार पाडली.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती/वाहतूक /विक्री/साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.