सोलापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना, आम्हाला कोणावरही टीका-टिपण्णी करण्याची इच्छा नाही. आजपर्यंत सत्तास्थानी असलेल्यांचा कारभार ग्रामस्थांनी अनुभवलेला आहे. आपल्या गावाला खऱ्या अर्थाने विकासाभिमुख करण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असे प्रतिपादन कासेगांव ग्रामपंचायत निवडणूक श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार यशपाल श्रीकांत वाडकर यांनी केले.
कासेगांव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रिंगणात श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनल उतरले आहे. या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ, सोमवारी ग्रामदैवत शंभू महादेवाला श्रीफल अर्पण करून करण्यात आला. तत्पूर्वी श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनल समर्थकांनी पदयात्रेने गावातील सर्व श्रद्धास्थानी जाऊन नारळ फोडला. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोबो शाह वली दर्गाह कट्ट्यावर बैठकीत रूपांतर होऊन झाला.
प्रारंभी महेश वाडकर यांनी प्रास्ताविक करताना, श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा अल्प परिचय करून दिला. त्यानंतर गांवचे उद्योजक बालाजी चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गेल्या ३-४ पंचवार्षिक निवडणुकांत घडलेल्या घटनाक्रमावर प्रकाश टाकताना, परिवर्तनाची गरज असल्याचे म्हटले.
कासेगांवच्या स्थानिक राजकीय पटलावरील नवा चेहरा यशपाल वाडकर यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचा लेखा-जोखा मांडताना, लोकरत्न स्व. श्रीकांत यांच्याप्रमाणे २० कलमी कृति कार्यक्रमाचं वाचन करीत ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी गांवाला पुरेसा वीजपुरवठा, जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि गावचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या तलावाचं साठवण तलावात रुपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन दिले. शेवटी ज्ञानेश्वर कदम यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.