सोलापूर : सकल मराठा समाज जुळे सोलापूर यांच्या वतीने सोलापूर दक्षिण चे आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जुळे सोलापूर समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आमदार सुभाष देशमुख यांना 'जवाब दो' आंदोलनानिमित्त आरक्षणासंबंधीची भूमिका विचारली असता, अपेक्षित उत्तर न मिळाल्याने सत्ताधारी देशमुख फेल ठरले, यावेळी त्यांच्यावरील समाज रोषाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या सहा दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्या अंतरवाली-सराटी (जिल्हा जालना) गांवी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. त्यांची प्रकृती क्षणा-क्षणाला खालावत चालली आहे. मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची एकमेव मागणी आहे. त्यांची प्रकृती विचारात घेता, सरकारला जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.
राज्यातील घटना लक्षात घेता सोलापूर शहर पोलिसांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविल्याने त्यास छावणीचे स्वरूप आले होते, अशातच मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जवाब दो आंदोलन करून मराठा समाजातील तरुणांनी आपला असंतोष व्यक्त केला. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला 'सपोर्ट' म्हणून राज्याच्या अनेक जिल्ह्यात तालुका आणि गांव पातळीपर्यंत मराठा समाजाची आंदोलन-उपोषणे सुरू आहेत, मात्र लोकप्रतिनिधी निर्णायक क्षणीही गप्प असल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्यासारख्या अन्यही लोकप्रतिनिधीवर समाजाचा असंतोष व्यक्त होताना दिसत आहे.
जवाब दो आंदोलन
सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा, जुळे सोलापूर यांच्या वतीने आज दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भात जवाब दो आंदोलन करण्यात आले. आ. सुभाष देशमुख हे मराठा समाजाचे असूनही ते मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे आमदारांचा व राज्य सरकारचा निषेध करीत रोष व्यक्त करण्यात आला.
यावेळी जुळे सोलापूर, मजरेवाडीसह हद्दवाढ भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या मनातील असंतोषाचा बांध फोडण्यासाठी मराठा समाज बांधवांनी आमदार देशमुख यांच्या निवासस्थानासमोर जवाब दो आंदोलन केले.
यावेळी मराठा तरुणांनी सुभाष देशमुख यांना एकच प्रश्न विचारला की, ५० टक्के मधून ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणबाबत तुमची भूमिका काय आहे, याचे उत्तर द्यावं. त्यावर सुभाष देशमुख यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही. त्यामुळे आमदार देशमुख यांच्या संधिग्ध भूमिकेचा निषेध करून मराठा तरुण संताप व्यक्त करीत सुभाष देशमुख यांच्या विरोधात घोषणा देत निघून गेले. यावेळी सकल मराठा समाज जुळे सोलापुराचे सर्व मराठा समाज बांधव-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.