शाळा बंद करून समुह शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा महाआक्रोश मोर्चा

shivrajya patra
सोलापूर : राज्य शासनाच्या २० पटसंख्येपर्यंयंतच्या प्राथमिक शाळा बंद करून समुह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने, सोमवारी दुपारी सोलापुरात महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत निघालेला महाआक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात महसूल वाढीसाठी राज्यात नव्याने १८ हजार शासनमान्य दारु दुकाने सुरु करण्याचा घाट घातला आहे. अशा स्थितीत राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करून सामान्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाणार असल्याची स्थिती आहे. शासनाने राज्यातील दुर्गम भागाबरोबरच इतरत्रही २० पटसंख्येपर्यंतच्या प्राथमिक शाळा बंद करून समुह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊन, त्याच्या अंमलबजावणी सुरू केल्याचे दिसत आहे.

शासनाचा निर्णय सामान्यांचा शिक्षणाचा मुलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची जनसामान्यांची भावना आहे. अशातच तो निर्णय शिक्षकांच्या भवितव्यावर गदा आणणारा आहे. शिक्षकांवर शाळाबाह्य कामे सोपवू नयेत, यावर विविध शिक्षक संघटनांचे एकमत आहे. आता शाळा बंद करून समुह शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात राज्यातील १५ हजार शाळांवर गंडांतर येणार आहे.

या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी, ०२ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आलेल्या शिक्षक-शिक्षिकांचा शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी निषेधाच्या घोषणा देत निघालेला शिस्तबद्ध महाआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
To Top