सोलापूर : मद्याच्या नशेत हाणामाऱ्या होतात, हे आजपर्यंत सर्वांनीच ऐकलं असेल, मात्र दारू न पिल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा गांधी स्टेडियम जवळ ५ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडलीय. या घटनेत दशरथ विजयसिंग बाबावाले हा २९ वर्षीय तरुण जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर सदर बझार, लष्कर भागातील बेडरपूल येथील रहिवासी दशरथ बाबावाले याला त्याच्या मित्रांनी कॉल करून वरील नमूद ठिकाणी बोलावून घेतले होते. तो तिथे आला असता, त्याचा मित्र राहुल दवेवाले व त्याचा मित्र अजय (पूर्ण नाव माहित नाही) दारू पिण्याचा आग्रह धरला.
त्याने मद्य प्राशन करण्यास नकार दिल्यावर त्यास जबरदस्ती करण्यात आली. तरीही तो पित नसल्याचे पाहून चिडलेल्या राहुल दवेवाले व त्याच्या मित्राने, तेथे असलेल्या काचेच्या दारूच्या बाटलीने डाव्या कानाजवळ मारली, त्यात त्याच्या कानास जबर दुखापत झाल्याचे पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याप्रकरणी जखमी दत्तात्रय बाबावाले यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी रविवारी पहाटेपूर्वी गुन्हा दाखल केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल वाडीकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.