जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला अनुमोदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर आमरण उपोषण

shivrajya patra

सोलापूर : सध्या मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत गंभीर झाला आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गातील शैक्षणिक व शासकीय सेवेतील आरक्षण मिळण्याच्या मागणीकरिता जालना जिल्ह्यात मनोज जरांगे- पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अनुमोदन देण्यासाठी प्रशांत देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बुधवारी, १३ सप्टेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्रातला मराठा समाजातील तरुण वर्ग आर्थिक विवंचनेत असल्यामुळे शैक्षणिक प्रवाह पासून दूर फेकला जात आहे. त्यामुळे समाजात बेरोजगारीचं प्रमाण वाढले आहे. उच्च शिक्षणाच्या अभावी त्याला शासकीय सेवेच्या संधीला मुकावे लागत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली-सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज आणि शासन खडबडून जागे झाले आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अनुमोदन देण्यासाठी सोलापुरातून प्रशांत सुधाकर देशमुख (रा. निर्मिती गणेश सोसायटी, राजस्व नगर रोड, विजापूर रोड, सोलापूर) यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह बुधवारी सकाळपासून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे. 
मराठा समाजाला ओबीसी वर्गातून शैक्षणिक व शासकीय सेवेसाठी आरक्षण मिळालं पाहिजे, या एकमेव मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू असल्याचे उपोषणकर्ते प्रशांत देशमुख यांनी सांगितले.


To Top