Type Here to Get Search Results !

तरुणांनी नोकरी करणारे ऐवजी नोकरी देणारे बनावं : डॉ. रविंद्र मिणियार



उद्योजकता विकास यात्रेचा थाटात समारोप

सोलापूर/०२ : उद्योजकता हा भारतीयांचा मूळस्वभाव आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांना याचा विसर पडला होता. मात्र आता तरुणांनी नोकरी करणारे ऐवजी नोकरी देणारे बनावे, असे प्रतिपादन उद्योजक व शिक्षण तज्ञ डॉ. रवींद्र मिणीयार यांनी केले. स्वावलंबी भारत अभियान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास यात्रेचा समारोप शनिवारी विद्यापीठात थाटात झाला.
डॉ. रवींद्र मिणीयार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे, प्रमुख पाहुणे लीड बँक मॅनेजर प्रशांत नाशिककर, सेवा भारतीच्या राष्ट्रीय सचिवा चंद्रिका चौहान, विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लड्डा, सेवावर्धीनीचे प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर, स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक विनायक बंकापूर, तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषदेचे प्रांत संयोजक सचिन पारवे उपस्थित होते. 
डॉ. मिणीयार म्हणाले, या उद्योजकता विकास यात्रेतून तब्बल ७ हजार उद्योजकांशी संपर्क झाला ही कौतुकाची बाब आहे. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची कास धरावी, असेही डॉ. मिणीयार यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. गौतम कांबळे म्हणाले, व्यवसाय उद्योग करण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण होण्यासाठी उद्योजकता विकास यात्रेचा खूप चांगला परिणाम होणार आहे. विकसनशील भारतीय अर्थव्यवस्थेला विकसित अर्थव्यवस्थेमध्ये परावर्तित करणे आवश्यक आहे. त्याकरिता भारतातील खेड्यांचा विकास झाला पाहिजे, असे मतही प्र. कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी मांडले.
नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर जमखंडीकर यांनी सूत्रसंचालन तर दीपक तरंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी आदित्य मस्के, ओम इंगळे, मदन कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि विद्यापीठाचे विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.