१४ सप्टेंबरला यशदा अभ्यासिकेचे उद्घाटन

shivrajya patra
                         (प्रतिकात्मक छायाचित्र) 
सोलापूर : जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर संचलित " यशदा अभ्यासिका " सुरु करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व इयत्ता दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी, यासाठी संघाने अद्यावत अभ्यासिका तयार केली आहे. गुरुवारी. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वा 'यशदा अभ्यासिकेचे उद्घाटन' विकासचंद्र रस्तोगी, (प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण खाते, महाराष्ट्र राज्य) यांचे शुभहस्ते करण्याचे योजिले आहे. अभ्यासिकेच्या उद्घाटनानंतर लगेच मुरारजी पेठेतील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या
किर्लोस्कर सभागृहात मान्यवरांचे मनोगत व्यक्त होणार आहे.

सदर अभ्यासिकेत  हायस्पीड वायफाय इंटरनेट, संपूर्ण वातानुकुलित हॉल, वॉटर प्युरीफायरचे पाणी, स्वतंत्र ग्लास कंपार्टमेट, प्रत्येक सीट आरक्षित, मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छताग्रह, प्रत्येकाला चार्जिंग पॉईट, डेस्क़ लॅम्प, आरामदायी खुर्ची, सीसीटीव्ही नियंत्रणाखाली संपूर्ण परिसर व स्वतंत्र पाकींग व्यवस्था, प्रत्येक कंपार्टमेंटला स्वतंत्र लॉकर अशा विविध सोयीसुविधा विद्यार्थ्यांना माफक दरात देण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने ग्रंथालय खात्याचे शासकीय अधिकारी, ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथालय सेवक आणि अनेकांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांची संख्या ९८४ वर नेली आहे. महाराष्ट्र शासनाचा "ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा" हा कोर्स चालवून अनेक ग्रंथपाल प्रशिक्षित केले असून ते कार्य अव्याहतपुणे सुरू आहे. संस्थेने उमा नगरी, जूना पूना नाका, सोलापूर येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन २ हजार स्क्वेअर फुटाची प्रशस्त इमारत बांधली आहे. 

शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना सतत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सातत्याने केला जात आहे. विभाग ग्रंथालय संघ, राज्य ग्रंथालय संघ, ग्रंथालय कर्मचारी संघ इ. च्या सहकार्याने ग्रंथालय चळवळीची वाढ, विकास होण्यासाठी संघ सहभागी असतो.

प्रतिनिधींनी हिराचंद नेमचंद वाचनालयात उपस्थित राहावे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितो म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, धर्मादाय उपायुक्त, म. न. पा. आयुक्त शितल उगले-तेली, पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, डॉ. गजानन कोटेवार (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, वर्धा), दत्तात्रेय क्षीरसागर (ग्रंथालय संचालक, मुंबई), शालिनी इंगोले (सहाय्यक ग्रंथालय, संचालक, पुणे) संतोष जाधव (जिल्हा ग्रंथालय, अधिकारी, सोलापूर) इत्यादींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. 

तरी या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, कवी, लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाहक साहेबराव शिंदे आणि सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
To Top