शांततामय सोलापूरकर ही संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी करावे सहकार्य : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

shivrajya patra
गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

सोलापूर/२६ : जिल्ह्यातील सर्व धर्मातील नागरिकांमध्ये परस्परात चांगला समन्वय असून प्रत्येकांचे सण उत्सव अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात साजरे केले जातात. जिल्ह्यातील सर्व नागरिक हे शांतताप्रिय असून शांतता हीच सोलापूरची संस्कृती आहे. तरी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे सण अत्यंत उत्साहाने व शांततेत साजरे करून सोलापूरची संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपधीक्षक गृह विजयालक्ष्मी कुर्री, सोलापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, मोहल्ला कमिटी सदस्य, मौलवी, अन्य समाजाचे प्रतिनिधी तसेच शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्मामध्ये सामाजिक सलोखा अत्यंत चांगला असून त्यांच्यातील ऐक्य भावनेतून सोलापूर जिल्ह्याची ओळख ही शांतताप्रिय जिल्हा अशी झालेली आहे. ही शांततेची संस्कृती जतन करण्यासाठी यापुढील काळातही प्रत्येक समाजात सलोखा व ऐक्य भावना चांगली रहावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

मुस्लिम बांधवाकडून ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने निघणारी मिरवणूक २९ सप्टेंबरला निघणार
२८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक जिल्ह्यात सर्वत्र होणार आहे. तसेच मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हा महत्त्वाचा सण असून याच दिवशी असलेली मिरवणूक मुस्लिम समाजाने, २९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल सर्व मुस्लिम धर्मियांचे त्यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यातील सर्व नागरिक सर्व समाजाचे सण एकत्रितपणे व आनंदाने साजरे करतात, हे फार महत्त्वपूर्ण असून परस्परांतील सामाजिक बांधिलकी खूप महत्त्वाची असून ही  ऐक्याची भावना अशीच राहावी व सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत. जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही या कालावधीत कोठेही अनुचित घटना होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. 

जिल्ह्यात मिरवणूक निघणाऱ्या रस्त्यावर ज्या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या तारा रस्त्यावर लोंबकळत आहेत. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्त कराव्यात. ईद-ए-मिलाद ची मिरवणूक ज्या दिवशी आहे, त्या दिवशी दारूबंदीचे आदेश देण्यात येतील. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रतिनिधी मुस्लिम अन्य धर्मीयांचे प्रतिनिधी यांच्याकडून आलेल्या सूचना व समस्यावर संबंधित विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगून मिरवणूक कालावधी अश्लील गाणे लावणे व त्यावर नृत्य करणे याबाबत संबंधित गणेश मंडळांनी स्वतःहून पुढे येऊन बंदी घालावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्री गणेश मंडळ व ईद-ए-मिलाद च्या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आवाजाची मर्यादा नियमबाह्य झाली तर 
कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक सुज्ञ व शांतताप्रिय नागरिक आहेत.गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी डॉल्बीच्या आवाजाची कायद्याने ठरवून दिलेली मर्यादा ओलांडू नये व ध्वनी प्रदूषण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. जर डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा नियमबाह्य झाली तर संबंधित गणेश मंडळ व डॉल्बी चालकावर पोलीस विभागाकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले.

३७५ गावात एक गाव एक गणपती

पोलीस विभागाच्या वतीने प्रत्येक तालुका पोलीस स्टेशननिहाय तालुकास्तरीय समित्या व मोहल्ला कमिटीच्या बैठका घेऊन सर्व धर्मीयांना सामाजिक सलोख्याचा संदेश दिलेला आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात एकूण २१००  गणेश मंडळानी श्री गणेशाची स्थापना केलेली आहे. तर ३७५ गावात एक गाव एक गणपती बसवण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी देऊन या सण उत्सवाच्या कालावधीत सर्व नागरिकांनी अत्यंत शांततेत उत्सव साजरे करावेत. सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव उत्साहाने साजरे करावेत व शांततामय सोलापूर जिल्हा या प्रतिमेला गालबोट लागू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनालाही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री गणेश मंडळांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, पदाधिकारी यांनी तसेच मुस्लिम धर्मियांचे मौलवी व अन्य प्रतिनिधी यांनी सामाजिक सलोखा व सण उत्सव साजरे करण्याबाबत विविध सूचना, विचार मांडले. तसेच प्रशासनाने काही समस्या सोडवाव्यात याबाबतही त्यांनी आपल्या सूचना मांडल्या.

प्रारंभी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम धर्मियांचे प्रतिनिधी, मौलवी, सामाजिक कार्यकर्ते व अन्य समाजाचे प्रतिनिधी तसेच पोलीस पाटील व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
To Top