बॅन्जो, डिजे ला फाटा देत 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात गणपतीची मिरवणूक

shivrajya patra

ग्रामस्थांनी फुलांची उधळण करीत केले गणपतींचे स्वागत

कासेगांव/ संजय पवार :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव मधील जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा प्रथमच ना गुलाल, ना बॅन्जो, ना डीजे, या सगळ्या गोष्टीला फाटा देत  'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात गुरुवारी गणेशोत्सव सांगता मिरवणूक निघाली. महाराष्ट्र परंपरेची जोड देत एक वेगळी ओळख निर्माण करताना, तरुणाई पुढं नवा आदर्श निर्माण केला आहे.

काही वर्षांपूर्वी 'एक गांव, एक गणपती' साजरा केलेल्या  कासेगांवमध्ये त्यापूर्वी अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा व्हायचा. यंदा १० तरुण मंडळांनी गणेशोत्सव मंडळानी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. जवळपास सर्वच मंडळानी आपापल्या गणेश मूर्तीची मिरवणूक डॉल्बी, डीजे आदी वाद्य लावून अत्याधुनिक वाद्यांच्या तालावर 'गणपती बाप्पा' ला भव्य मिरवणुका काढत गणरायाला निरोप देताना त्याचवेळी पुढच्या वर्षी लवकर येण्याची हाक दिली. 

मठगल्लीमधील जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा प्रथमच 'ना गुलाल, ना बॅन्जो, ना डीजे लावत टाळ-मृदुंग व विणा व संतांच्या जयघोष करीत आपली मिरवणूक काढली.

या लक्षवेधी उपक्रमाबद्दल मंडळाच्या वतीने ग्रामस्थांना बरोबर घेऊन संत सावता माळी भजनी मंडळ, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, महादेव मंदिर भजनी मंडळ यांना बोलावून हरी नामाचा गजर करीत गावातून सवाद्य मिरवणूक काढली. आधुनिकतेला फाटा देत जुन्या काळातील मिरवणूक पद्धतीने मिरवणूक काढली. ही गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

अनेकांनी मंडळाच्या या उपक्रमाचं स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. अशीच परंपरा इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जपावी, असं आवाहन त्यांनी केले. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्या ची उधळण करीत स्वागत केले. हनुमान, राम, लक्ष्मण,  सीता आणि इतर देवतांच्या वेशभूषा परिधान करून लहान मुलांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. 

याकामी पुढाकार मंडळाच्या वतीने लखन वानकर, शिवम जाधव, नितीन वाडकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष रामअप्पा चौगुले, चंद्रकांत चव्हाण, अमोल जाधव, तुषार जाधव, सूरज परिट, महेश जाधव, मेघराज सरसंबे यांच्यासह अनेक जणांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ना पोलिस, ना गोंधळ अशी ही मिरवणूक मात्र चर्चेची ठरली आहे.
To Top