'त्या' घटनेतील जखमी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

shivrajya patra
सोलापूर :
जालना जिल्ह्यातील अतंरावली-सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीत अनेक अधिकारी,पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने जखमी झाले. त्यांना वैद्यकीय उपचाराबरोबरच आर्थिक स्वरूपात भरीव मदत करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी प्रजापिता सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने सोमवारी, येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

अतंरावली-सराटी येथील त्या घटनेत, जखमी पोलीस कर्मचाऱ्यांत काहींचे हातापायास गंभीर जखमा झाल्या असून डोकीस जबर दुखापत झालेले जखमी आजही वैद्यकीय उपचार घेत असल्याचे सांगण्यात येते. या गंभीर विषयाला वाचा फोडण्यासाठी, प्रजापिता सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, असा आग्रह असून निलंबित अधिकाऱ्यांना ताबडतोब सेवेत रुजू करून घ्यावे, अशीही मागणी आहे. 
सध्या सोलापूर शहरात अवैध व्यवसाय आणि व्यावसायिकांचा धुमाकूळ सुरू आहे. सर्वत्र मटका-गुटखा, प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू मिश्रीत मावा, जुगार, गांजा, बेकायदेशीर डान्स बार, अशा स्वरूपाच्या अवैध धंद्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची  मूकसंमती व पाठिंबा आहे. हे अवैध व्यवसाय आणि व्यवसायिक यांच्या बिनधास्त वर्तनामुळे शहरातील शांततेला कोणत्याही क्षणी कमी-अधिक प्रमाणात गालबोट लागू शकते, असे भय सामान्यांतून व्यक्त केले जात आहे.
सोलापूर शहरातील अवैध व बेकायदेशीर धंद्यांच्या आडून गुंड प्रवृत्तीच्या मंडळींना अभय देण्याचे काम होत आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यातील काही लोकांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे असून सुद्धा त्यांना अटक नाही, अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे अध्यक्ष डी.डी पांढरे यांनी म्हटलं आहे.
To Top