सोलापूर : युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कोंडी व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले.
१४ वर्षे वयोगट योगासन स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर मधील विद्यार्थ्यांनी यश खेचून आणली. त्यामध्ये सह्याद्री निळ, सिद्धी घडमोडे यांनी नजरेत बसणारे यश मिळविले, तर १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये श्रद्धा जाधव, अभिषेक सुरवसे यांनीही आकाशाला गवसणी घालणारे यश मिळविले. या स्पर्धेमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.
१९ वर्षे वयोगटांमध्ये श्रेया विश्वकर्मा हिने योगासन या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.१७ वर्षे वयोगट बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये रोशन बडोदिया या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड समितीने निवड केली, तर कुणाल बडोदिया या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक पटकाविला.
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात असल्यामुळेच या संकुलातील विद्यार्थ्यांनी तालुक्यातील स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुषमा नीळ, मुख्याध्यापिका तेजश्री कुलकर्णी, औरादे मॅडम उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना दिलीप भोसले या क्रीडा शिक्षकाचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.