माझा दररोज वापर करणारी
ही माणसं आज माझ्यावरच उठली
विसरून उपकार ही माणसं आज
माझ्यावरच दगडं घेऊन सुटली
माझ्याकडून सुरक्षित प्रवास केलेली
माणसंच आज इतकी निर्लज्ज झाली
चातकासारखी माझी वाट पाहणारी
माणसचं मला जाळण्यासाठी सज्ज झाली
माझ्या अंगावर रॉकेल ओतायला
एकत्र कशी मिळतात ही माणसं ?
माझा काहीच गुन्हा नसतांना
मलाच का जाळतात ही माणसं?
ही तीच माणसं आहेत, जी काल मी
गावात यावे म्हणून झगडत होती
यांचीच मुले शाळेत जातांना माझ्या
कुशीत आनंदाने मस्त-मजेत बागडत होती
सुरक्षिततेची अपेक्षा ठेवणारी
माणसं आज मलाच जाळत आहेत
मला जीवनवाहिनी समजणारी माणसं
माझ्या जीवाशी निष्ठुरपणे खेळत आहेत
माझ्याशिवाय जगू न शकणारी माझ्या
जीवाशी का खेळतात ही माणसं ?
माझा काहीच गुन्हा नसतांना
मलाच का जाळतात ही माणसं ?
मला दगड मारणाऱ्यांनो मला फोडून
तुमचे हक्क मिळणार आहेत का ?
मला वेदना देऊन तुमच्या भावना
सरकारला कळणार आहेत का ?
मला जाळणाऱ्या प्रत्येकांनी ही गोष्ट
कायमची लक्षात घेतली पाहिजे...!
लेखक : अज्ञात,
शिवभार : सामाजिक माध्यम.