Type Here to Get Search Results !

आमच्यावरील अन्याय कधी थांबणार ? ‘शासन आपल्या दारी’ त आदिवासी महादेव कोळी समाजाचा सवाल

 

पंढरपूर : पंढरीतील आदिवासी महादेव कोळी जमातीचे हजारो विद्यार्थी ‘आमच्यावरील अन्याय कधी थांबणार? आमच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न कधी सोडवणार? असा जाब शासनाला विचारणार आहे. यासाठी आज महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आपटे प्रशालेत जाऊन येथील आदिवासी महादेव कोळी जामातीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी सरकारकडे नेमके कशा पध्दतीने आपले म्हणणे सांगायचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले.  

येत्या १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे शासन जनतेचे प्रश्‍न थेट ऐकून ते सोडविण्याच दृष्टीने प्रयत्न करणार आहे. 
 
आादिवासी कोळी जमातीचे जातीचे दाखले काही जणांना मिळाले, परंतु अनेक जण जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. ज्यांच्याकडे जातीचे दाखले आहेत, अशांच्या सख्ख्या भावाला सुध्दा जातीचा दाखला मिळत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आदिवासी कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्याच्या रखडलेल्या प्रश्‍नाला सोडविण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बंधू-भगिणी मोठ्या संख्येने पंढरपरात येणार आहेत, आपल्या जातीच्या दाखल्यासह आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने विनंती करणार आहेत. यासोबतच शालेय विद्यार्थी व पालकांनीही जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन पुराव्यासह आपल्या जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न तातडीने कायमस्वरुपी सोडवावा, अशी विनंती शासनाला करणार आहेत.

आदिवासी कोळी जमातीच्या वरील दोन प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाने अनेक निवेदनं दिली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनंही केली, परंतु आजतागायत हे प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासनाने ठोस कारवाई केलेली नाही. आत्ता वेळ आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाच थेट आपण सर्व समाजाने मिळून निवेदनं देऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याची. यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनीही एकमुखाने वरील प्रश्‍न सोडविण्याची मागणी शासनाला थेट करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या शासनाच्या उपक्रमात सामील व्हायचे आहे. आपल्या जातीच्या दाखल्याच्या प्रश्‍नामुळे आपल्या उज्जवल भवितव्यासाठी शासनाला जागं करायचंय, असे आवाहन गणेश अंकुशराव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. 

यावेळी संपत सर्जे, सोमनाथ अभंगराव, रामभाऊ कोळी, वैभव कांबळे, प्रकाश मगर, कृष्णा वाडेगावकर, गणेश तारापुरकर, गणेश अभंगराव, गुंडोजी नेहतराव यासह असंख्य कार्यकर्ते व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हर हर महादेव, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचा विजय, एक तीर एक कमान सारे आदिवासी एकसमान अशा घोषणा दिल्या.

शासन व प्रशासकीय अधिकारी जाणुनबुजून आमच्या प्रश्‍नांकडं लक्ष देत नाही तरी आत्ता तरी आमच्याकडे लक्ष देऊन आमच्याशी संपर्क साधावा असं मत यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले. आम्हाला गृहीत न धरल्यास परिणाम गंभीर होतील व यासाठी सर्वस्वी प्रशासकीय अधिकारी व शासन जबाबदार राहील. असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलाय.