शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात शिक्षक भारती ही लढाई शेवटपर्यंत लढणार : सुजितकुमार काटमोरे
देशभरात सर्वत्र शिक्षक दिन साजरा करीत त्यांचे समाज उभारणीसाठीचे योगदान आणि कार्याचा गुणगौरव होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 'शिक्षक भारती' ने याच दिनी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे. मागील २-३ वर्षांपासून कार्यालयीन काम स्वतः न करता शासकीय कामाकरिता खाजगी लिपिक व शिपाई नेमून त्यांच्याकडून कामे करून घेणे, कार्यालयात वेळेवर न येणे, कार्यालयीन कामासाठी पैशाची मागणी करणे अशा प्रकारचे आरोप असलेले कनिष्ठ सहाय्यक लिपिक संजय बाणूर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्यांची शिक्षण विभागातून बदली करण्यात यावी, यासाठी या आमरण उपोषणाचा प्रारंभ झाला आहे.
तत्कालीन अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांनी अदा केलेल्या ७७ कोटींच्या वैद्यकीय बिले व थकीत फरक बिलांची चौकशी करण्याकरिता शासन निर्णयानुसार तात्काळ चौकशी समिती बसविण्यात यावी, प्रलंबित सर्व अनुकंपा तत्वावरील मान्यता तात्काळ देण्यात याव्यात तसेच अनुकंपा तत्वावरील मान्यतेसाठी जागा रिक्त नसलेल्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी बनविण्यात यावी, माहिती अधिकारात मागितलेली माहिती तात्काळ मिळावी, माहिती न दिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव संस्थेकडून जाणीवपूर्वक दिले जात नाहीत तरी सर्व पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात यावी, यासह शिक्षकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या १८ मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.
आमरण उपोषणाच्या प्रारंभी सुजित कुमार काटमोरे, शशिकांत पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष विजयकुमार गुंड यांच्यासह सहशिक्षक मायप्पा आनंदा हाके, लिपिक शरद पवार, सहशिक्षिका श्रीमती नौशाद सय्यद आणि सहशिक्षिका श्रीमती यास्मिन अन्सारी हे सहकुटुंब प्राणांतिक उपोषणास बसले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.