बालिकेच्या निर्दयी हत्त्या प्रकरणात नाही गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

shivrajya patra
सोलापूर: किरकोळ तक्रारीचा रोष मनात धरून,
अंदाजे अडीच वर्षीय मुलीस विहिरीत फेकून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार करमाळा तालुक्यातील सोगाव येथे घडला. कु. अश्विनी हिच्या हत्येस जबाबदार असलेल्या विष्णू नामदेव भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास करमाळा पोलिसांनी आजपर्यंत चालढकल केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांनी या हत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवार कुटुंबीयांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

सोगाव येथे वास्तव्यास असलेला बापू पिंगळ्या पवार, त्यांचे आई-वडील, पत्नी राणी आणि त्यांच्या लेकरासह एकत्र वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी कु. अश्विनी (वय-२ वर्षे, ४ महिने) घराजवळील जांभळीच्या झाडाखाली खेळत असताना विष्णू नामदेव भोसले याने तिला खांद्यावर घेऊन जवळच असलेल्या विहिरीत नेऊन टाकले. तो त्या बालिकेस खांद्यावर घेऊन विहिरीकडे जात असताना, तिची आई राणी पवार आणि जाऊ किशोरी पवार त्याच्या मागे धावत होत्या. राणीने विहिरीत उडी टाकून अश्विनीला पाण्याबाहेर काढले. ती बेशुद्ध अवस्थेत होती. ही घटना २४ ऑगस्ट रोजी भरदुपारी घडली.
हा थरारक प्रकार घडल्यावर पिंगळ्या पवार व त्याचा मुलगा बापू या दोघांनी करमाळा पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी आणलेल्या ॲम्बुलन्स मध्ये कु. अश्विनी हिला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह पवार कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र तिच्या मृत्यू संबंधी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे.

कु. अश्विनी या बालिकेची निर्दयी हत्या विष्णू भोसले याने केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पवार कुटुंबीयांनी करमाळा पोलीस ठाणे आणि त्यानंतर एक सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे दिले. तेथेही त्यांना चार दिवसाच्या चौकशीचा कालावधी सांगितला मात्र कार्यवाही शून्य झाल्याचे मृताची . आई राणी पवार हिने सांगितले.

कु. अश्विनीच्या अमानुष हत्येस विष्णू भोसले हाच जबाबदार असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, या एकमेव मागणीसाठी पवार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी, सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असं पवार कुटुंबीयांनी सांगितले आहे.

To Top