उच्च न्यायालयाच्या आदेशाची व्हावी अंमलबजावणी
सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सोलापूर शहरात राजरोसपणे अनधिकृत डिजिटल बॅनर, मोठी झाडे तोडून अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून येत आहेत. याबाबतीत पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. संबंधितांच्या दुर्लक्षामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनास द्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केली.
सोलापूर शहराकडे उत्सव प्रिय शहर म्हणून पाहिले जाते. वेगवेगळ्या जयंती व कार्यक्रमानिमित्त हृदयाचे ठोके चुकावेत वा कानाचे पडदे फाटल्याचा भास व्हावा, इतक्या मोठ्या आवाजाचे डॉल्बी-बेस सिस्टीम लावण्यात येतात. हृदयविकार असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. अनेक रुग्ण आणि नागरिकांना याचा फटका बसत आहे. प्रशासनाकडून या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्सर डोळेझाक होत आहे. अशा डॉल्बीवर बंदी घालण्यात यावी, डॉल्बी लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी संभाजी ब्रिगेडची प्रमुख मागणी आहे.
सोलापूर शहरात डिजिटल बॅनरचे फुटले आहे, सोलापूर महानगरपालिकेने डिजिटल बॅनर लावण्यासंबंधी नियमावली निश्चित केली आहे. त्या नियमावलीला सर्रासपणे पायदळी तुडविले जात आहे. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या चौकटीला मोडीत काढून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचेल, असे डिजिटल लावणाऱ्या लोकांवर कारवाई होऊन डिजिटल मुक्त व डॉल्बीमुक्त सोलापूर शहर होणे गरजेचे असल्याची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
सोलापूर शहरांमध्ये प्रत्येक चौका-चौकात अनधिकृत डिजिटल बॅनरचे पेव फुटले असून त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांना या अनधिकृत डिजिटल बॅनरच्या त्रास होत असून त्याचा व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे.
त्यामुळे सोलापूर शहरातील सर्वच ठिकाणी लागलेले अनधिकृत डिजिटल बोर्ड तात्काळ काढण्यात यावेत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर शहरांमध्ये डिजिटल बॅनर व डॉल्बी लावण्यास कायमस्वरूपी बंदी आणावी. अन्यथा उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान होत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपचार प्रमुख सिताराम बाबर, शहर सचिव रमेश चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, जिल्हा संघटक बबन डिंगणे, जिल्हा सचिव राजेंद्र माने, दत्तात्रय लामकाने, ओंकार कदम आणि अक्षय चौगुले आदी उपस्थित होते.