मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यादरम्यान सोमवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी कारगिलच्या बारू येथे शुभारंभ होणार होता, खराब हवामानामुळे ते बारू येथे पोहोचू शकले नाहीत. मात्र या मॅरेथॉनमधील स्पर्धक द्रास येथे स्मारक बघण्यासाठी आले असता, तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली, या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदे यांनी लष्करी जवानांशी संवाद साधून मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.
जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय' या मराठी अनुवादित पुस्तकाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मेजर जनरल सचिन मलिक, कारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे, कारगिलचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनायत अली, 'सरहद' चे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, 'अरहम' समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, 'सरहद' चे सदस्य अनुज नहार ब्रिगेडियर सुमित, कर्नल शशांक, लेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लत, मॅरेथॉनचे संचालक वसंत गोखले, तांत्रिक संचालक सुमित वायकर, फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी मान्यवर उपस्थित होते.
द्रास युद्ध स्मारकातील शहीदांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री यांनी भेट देऊन युद्धकाळातील वस्तू, शस्त्रांची पाहणी करुन माहिती घेतली.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातून बाईकवरून देशभ्रमंतीला निघालेल्या कुमार पिसाळ या तरुणाची द्रास येथे भेट झाली. कुमार हा दिव्यांग असूनही दिव्यांग सशक्तीकरण आणि हेल्मेट वापरून सुरक्षित रस्ते प्रवासासाठी जनजागृती करण्यासाठी त्यांचा हा प्रवास सुरु आहे.
तब्बल १६ दिवसांच्या प्रवासानंतर द्रासला पोहोचला असता, तिथे त्याने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या संबंधीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केलीय.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार आणि भारतीय सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.