श्रीनगर : महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी 'सरहद' संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध होते, याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जम्मू-काश्मिर दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला रविवारी भेट दिली. येथे मराठी सोनार समाजामार्फत गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी जम्मू काश्मीरवरची सर्व विघ्ने, संकटे दूर होऊ दे ! अशी प्रार्थना यावेळी गणरायाला केली.
"येत्या नवरात्रौत्सवात काश्मीर दौऱ्यावर याल, त्यावेळी महाराष्ट्र भवनच्या इमारतीचे भूमिपूजन केले जाईल" या शब्दात नायब राज्यपाल सिन्हा यांनी मुख्यमंत्री यांना जाहीर निमंत्रण दिले. सिन्हा यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
पनवेल येथे काश्मिरी नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'नमो ११ कलमी' कार्यक्रमांची माहिती देऊन जी-२० परिषदेमध्ये काश्मीरसह अनेक राज्यांना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.