फलोत्पादन समुह विकास योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूरची निवड
सोलापूर : भारतीय फलोत्पादन क्षेत्राची जागतिक, देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, उत्पादनाच्या कापनीनंतर हाताळणी, मूल्यवर्धन आणि बाजार जोडणी या करिता पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरीता, निवडलेल्या पिक समुहामध्ये स्पर्धा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व पध्दतीचा वापर करण्याकरीता आणि जागतीक मुल्यसाखळीत भागधारकांना सामिल करुन घेण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने फलोत्पादन क्लस्टर विकासाचा नविन कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब क्लस्टर साठी २४७.६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.
भारत हा जागतिक स्तरावर फलोत्पादन पिकाचा सर्वात मोठा उत्पादक असून फळे आणि भाजीपाला जागतिक उत्पादनात १० टक्केपेक्षा जास्त वाटा आहे. सन २०१९-२० या वर्षात देशाने २५.६६ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर ३२०.७७ दशलक्ष टन आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पादन नोंदविले आहे, परंतु निर्यातीमध्ये १.७ टक्के भाजीपाला व ०.५ टक्के फळपिके इतका वाटा आहे. जो इतर देशांपेक्षा अत्यंत कमी आहे.
केंद्र शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातून ५५ फलोत्पादन समुह निवडले असून त्यापैकी १२ समुह, फलोत्पादन समुह विकास योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर निवडलें आहेत. त्यापैकी २ फलोत्पादन समुह महाराष्ट्रातून निवडले असून त्यामध्ये द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूरचा समावेश आहे. सोलापूर डाळिंब क्लस्टरला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी पूर्व उत्पादन उत्पादन, - काढणीनंतरचे व्यवस्थापन व मुल्यवर्धन आणि लॉजिस्टिक्स, विपणन व ब्रेडिंग यासह संपुर्ण मुल्य शृंखलेच्या तीन्ही अनुलंब (Vertical) विकासाचा समावेश केलेला आहे.
केंद्र शासन स्तरावरील प्रकल्प मान्यता समितीने मान्यता दिली आहे. सोलापूर - डाळिंब क्लस्टरसाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मे. बी. व्ही. जी. ग्लोबल फार्म वर्क्स लि. सोलापूर या संस्थेस मान्यता दिली. सदर प्रकल्पासाठीचे मे. बी. व्ही. जी. ग्लोबल फार्म वर्क्स लि. सोलापूर यांना अंमलबजाणी यंत्रणा म्हणून स्वीकृती पत्र ०९ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाले व सुनील चव्हाण (आयुक्त कृषी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. के. पी. मोते (संचालक फलोत्पादन), उदय देशमुख (प्रकल्प व्यवस्थापक), विजयकुमार चोले (मे.बी. व्ही. जी. ग्लोबल फार्म वर्क्स) हे उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे २० हजार हेक्टर डाळिंब क्षेत्र व ३० हजार शेतक-यांना फायदा होईल. या प्रकल्पाची किंमत रक्कम रू. २४७.६७ कोटी असून त्यापैकी रक्कम रू. ९८.९२ कोटी केंद्रीय कृषि मंत्रालय
टिशू कल्चर प्रयोग शाळा- २, १२ हजार ९०० हे. क्षेत्रावरील जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, २० हजार हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन- २० हजार हे. क्षेत्रावर एकात्मिक किड व्यवस्थापन, १२ हजार ९०० हे. क्षेत्रावर प्लास्टिक अच्छादन, २० हजार हे. क्षेत्रावरील फळपिकाचे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, शीतगृह (५००० MT ) - २, पूर्व शीतकरण गृह/फिरते पूर्व शीतकरण गृह-२८, एकात्मिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केंद्र- २, टर्मिनल मार्केट/ होलसेल मार्केट- १ हे घटक राबणीण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ४ वर्षात कार्यान्वित होणे अपेक्षित असून यामुळे सोलापूर डाळिंब क्लस्टर फलोत्पादन परिसंस्थेचा कायापालट होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रातून सोलापूरसह दोन क्लस्टरची निवड
"केंद्रशासनाने देशातून प्रायोगिक तत्वावर निवडलेल्या १२ समुह विकास कार्यक्रमापैकी द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूर या दोन क्लस्टरची महाराष्ट्रातून निवड केलेली आहे. सोलापूर डाळिंब क्लस्टर करिता मे. बी. व्ही.जी. ग्लोबल फार्म वर्क्स लि. सोलापूर या संस्थेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान व पायाभुत सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे भविष्यात डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा वृध्दिंगत होण्यास मदत होईल."