Type Here to Get Search Results !

अमानुष लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने



महामार्गावर कोंडी येथे रास्ता रोको; मोहोळमध्ये पूतळा दहन
सोलापूर : मराठा समाज आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी बेछुट लाठीचार्ज करण्यात आला. जालन्यात घडलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरील अमानुष लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने सुरू आहेत. संभाजी ब्रिगेडने शनिवारी सकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी येथे संभाजी ब्रिगेडने महामार्गावर रास्ता रोको केला. ' जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत मोहोळ शहरात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करीत त्या अमानुष घटनेचा निषेध नोंदविला. 
जालना जिल्ह्यातील सराटी अंतरावाली येथे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या एकमेव मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून गावकरी बेमुदत आमरण उपोषणास बसलेले आहेत. सदरचे आंदोलन संवैधानिक पध्दतीने व शांततेत चालू असतांनाही पोलिसांनी बळाचा गैरवापर करून सदरचे आंदोलन चिरडून टाकण्याच्या हेतूने आंदोलनास बसलेल्या महिला-पुरुषांसह अबाल-वृध्दावर बेछूट लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे १५-२० आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले.
त्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना आहे. आरक्षण मागणीचा रेटा पुढे नेण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करीत असलेल्या समाज बांधवांवर निर्दयी प्रवृत्तीने झालेल्या लाठीचार्जचा मराठा समाज सर्वत्र निदर्शने करून निषेध नोंदवतोय. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन आणि एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
त्या अमानुष घटनेनंतर शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. राज्यातील वेगवेगळ्या भागात अनेक ठिकाणी आज निदर्शने सुरु आहेत. शनिवारी मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यावर आंदोलनाची पुढील भूमिका पुढे येईल. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत मराठा समाज आपला संताप व्यक्त करतोय.
सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी येथे मराठा समाजाचा रास्ता रोको करून शासनाच्या निर्दयी प्रवृत्तीचा जाहिर निषेध करण्यात आला. रस्त्यावर सुरू असलेल्या निदर्शने आंदोलनाचा प्रमुख मार्गावरील वाहतुकीला व्यत्यय आला. मराठवाड्यात निदर्शने तीव्र स्वरुपाची असून त्याचा एस.टी. सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात एस.टी. सेवा बऱ्यापैकी सुरू असल्याचे दिसत असले तरी मराठवाड्याचा अनेक मार्गावरील राज्य परिवहन सेवेत विस्कळीतपणा आल्याचे अथवा अनेक मार्गावरील सेवा बंद असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगितले गेले आहे.
मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारवरील आपली तीव्र नाराजी व्यक्त करतोय. मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केल्याप्रकरणी जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तातडीने निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करणेबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास लाठीचार्जच्या निषेधार्थ, मराठा क्रांती मोर्चातर्फे सोलापूर बंद पुकारण्यात येईल. त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील, असेही त्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, योगेश पवार, प्रताप चव्हाण, शशी थोरात, विजय पुकाळे, अनंत जाधव, दास शेळके, राम गायकवाड, सुनिल रसाळे, नाना मस्के, बजरंग जाधव, बापूसाहेब घुले, शेखर फंड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या,रविवारी सोलापूर जिल्हा बंदची हाक दिलीय.◼️