भाजप शहराध्यक्ष काळे यांची धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या बांधवांना मारहाण करणे गैरच !... याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील : चेतन नरोटे

shivrajya patra

... याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील : चेतन नरोटे

सोलापूर : गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी धनगर समाज बांधव रस्त्यावर लढा देत आहेत. त्यांची मागणी न्याय्य असून आमची सत्ता आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला जाईल, असे आश्वासन विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. राजकर्त्यांना या आश्वासनाचा विसर पडला. त्याचा परिपाक म्हणून शुक्रवारी, पालकमंत्र्यांवरील भंडाऱ्यात झाला. जे घडले ते अनावधानाने तेही चुकीचचं ! या घटनेनंतर भाजपा  शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला.


विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाला दहा वर्षे उलटून गेली, तरी धनगर समाज बांधव संयमाने आपल्याला मिळणाऱ्या आरक्षणाची वाट बघत आहेत. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. आता धनगर समाजाच्या संयमाचा बांध फुटलेला आहे. विद्यमान राज्यकर्त्यांकडून आरक्षण देण्यासाठी पद्धतशीर टाळाटाळ केली जात आहे. या गोष्टीने धनगर समाजाचे तरुण पेटून उठले आहेत, याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन देताना एका समाजबांधवाचा भावनेचा उद्रेक होऊन त्यांनी पवित्राचा भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर टाकला. 

वास्तविक पाहता असे व्हायला नको होते, परंतु जेव्हा भावनेचा उद्रेक होतो, त्यावेळी परिणामाचा विचार संपतो. अशा भावनिक प्रसंगात घडलेले हे कृत्य आहे, यावेळी ज्यांनी धनगर समाजाचे कार्यकर्ते म्हणून भाजप शहराध्यक्ष पदाचा मान मिळवला. त्या नरेंद्र काळे यांनी त्या प्रसंगात सामोपचाराची भूमिका घेणे क्रमप्राप्त होते, परंतु असे न घडता, आपल्याच समाज बांधवांवर हात उभारत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा समस्त धनगर समाज आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो, असे चेतन नरोटे यांनी म्हटले.

यापुढे समाजापुढे येताना भारतीय जनता पार्टीने दहा वेळा विचार करून पुढे यावे, याप्रसंगी नरेंद्र काळे यांचे कृत्य म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असाच म्हणावे लागेल. कोणत्याही समाजाचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी अशा बाटग्या कार्यकर्त्यांचा वापर भाजपा सातत्याने करत असतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नरेंद्र काळे यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूर शहरात फिरणे मुश्किल होईल, असा इशाराही नरोटे यांनी यावेळी दिला.

अशा प्रकारचे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने केले जातील, त्याउपर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी नरेंद्र काळे आणि भाजपा सरकारची असेल, असेही नरोटे यांनी म्हटले.
To Top