सोलापूर : कृषी मशागतीसाठी लागणारे पावर टिलरचे अनुदान मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणात कृषी पर्यवेक्षक भारत मारुती शेंडे यांनी पडताळणी रिपोर्ट न जोडल्याने लाभार्थी लाभापासून वंचित राहिला होता. त्यास ते अनुदान मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना भारत शेंडे यांना सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगीहात पकडले.
याबाबत एसीबी कार्यालयाने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे शेतीच्या कामासाठी त्यांच्या पत्नीच्या नावे महाराष्ट्र शासनाच्या महा-डिबीटी या पोर्टलवर पॉवर टिलर खरेदीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदानासाठी, ३० मे २३ रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर ऑनलाईन पध्दतीने सोडत होऊन तक्रारदार यांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळाली होती.
त्यानुसार तक्रारदार यांनी पॉवर टिलर खरेदी करून त्याबाबतची सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली. त्यानंतर लोकसेवक भारत शेंडे यांनी तक्रारदार यांचे पॉवर टिलरची पडताळणी करून खरेदीची सर्व कागदपत्रे तक्रारदार यांच्याकडून घेतली होती. परंतु त्यांनी पडताळणी रिपोर्ट सबमिट न केल्याने तक्रारदार यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले नव्हते.
त्यामुळे तक्रारदार यांनी आलोसे शेंडे यांना संपर्क केला असता, त्यांनी तक्रारदार यांचे पडताळणी रिपोर्ट सबमिट करण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीसंबंधी अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, यातील आरोपी लोकसेवक कृषि पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीस पॉवर टिलरच्या अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी त्याकरिता लागणारे कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची लाचेची मागणी करुन ती लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कामगिरी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पोह/ प्रमोद पकाले, पोकॉ/ गजानन किणगी, चापोह / राहुल गायकवाड (सर्व नेमणूक - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर) यांच्या पथकाने पार पाडली.