सोलापूर : मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ व जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे तातडीने निलंबित करून त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेेरा मैल येथे सोमवारी, ०४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. राष्ट्रीय छावा संघटना, सोलापूर जिल्ह्याच्यावतीने रास्ता रोको/लाक्षणिक चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष योगेश (दत्ता) पवार यांनी दिलीय.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी आंतरवाली गावकरी आमरण उपोषणास बसले होते. ते बेमुदत आमरण उपोषण आंदोलन चिरडून टाकण्याच्या दुष्ट हेतूने जालना पोलिसांनी तेथील मराठा बांधवांवर लाठीचार्ज करून १५-२० आंदोलनकर्त्यांना गंभीर जखमी केले.
त्या लाठीहल्ल्यास प्रमुख जबाबदार असलेले जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचेसह यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरा मैल येथे सकाळी ११ वा. ते दुपारी ०१ वा. दरम्यान राष्ट्रीय छावा संघटना, सोलापूर जिल्ह्याच्यावतीने रास्ता रोको/लाक्षणिक चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटना, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश (दत्ता) पवार यांनी केले आहे.