Type Here to Get Search Results !

खरा शिक्षक दिन कुणाचा ?

"गांडू भडवे रण चढे, मर्दों के बेहाल.पतिव्रता भूखन मरे,पेढे खाये छिनाल." असा संत कबीरदासांचा एक अतिशय सुंदर आणि वास्तववाद दर्शविणारा दोहा प्रसिद्ध आहे. आज आपल्या भारतीय समाजव्यवस्थेकडे बारकाईने आणि उघडपणे पाहिले तर पदोपदी याची प्रचिती येते.

आपल्या भारतीय संस्कृतीत (?) वर्णव्यवस्था आणि विषमतावादी जातीव्यवस्थेतील  गुरु-शिष्य म्हणजे शिक्षक-विद्यार्थी  ही परंपरा पाहिली तर कालपर्यंत शिक्षण देणे हे आणि शिक्षण ग्रहण करण्याचा हक्क केवळ एका विशिष्ट वर्गासाठी म्हणजेच केवळ  'ब्राह्मण' समाजासाठी मर्यादित  होता. बहुजन आणि इतर वंचित घटकांना शिक्षण/विद्या ग्रहण करण्याची तर दूरच अगदी दुरुन ऐकण्यावर देखील बंदी होती.

इतिहासात डोकावल्यावर एक आश्चर्य आणि संतापजनक प्रसंग दिसून येतो, तो म्हणजे केवळ आदर भावना मनी बाळगून प्रतिमा समोर ठेवून सराव करुन धनुर्विद्येत पारंगत झालेल्या भोळ्या भाबड्या 'एकलव्या' चा केवळ  तो जातीने  शूद्र श्रेणीतला असल्याने त्याला शिक्षण घेण्याची बंदी असूनही त्याने स्वयं साधना करून धनुर्विद्या शिकली  म्हणून भविष्यात कधीही त्याचा धनुर्धारी म्हणून गौरव होऊ नये, यासाठी धनुष्य चालविण्यासाठी महत्वाचा असणारा अवयव म्हणजेच श्रेष्ठ धनुर्धारी एकलव्याच्या डाव्या हाताचा अंगठाच गुरू दक्षिणा च्या गोंडस नावाखाली कापून घेण्याचा दुष्टपणा द्रोणाचार्यांनी केल्याचा इतिहास याच महान परंपरेतील (?) आहे. तरीदेखील आपण गुरूंचा सन्मान, गुरू प्रती आदर व्यक्त करण्यासाठी नेहमीच दक्ष असतो.

याच कल्पनेतून कदाचित एखादा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून पाळला जात असावा. प्रथा म्हणून आपल्या देशात दरवर्षी, ०५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जात असावा असे वाटायचे. परंतु ०५ सप्टेंबर हाच दिवस का ?‌ याचा शोध घेतला असता,  तो दिवस डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म दिवस असल्याने आणि त्यांनी स्वतःहून हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती, म्हणून  साजरा करण्यात येतो, असे सांगितले जाते. 

परंतु राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, त्यांच्या इच्छे व्यतिरिक्त राधाकृष्णन यांची  आणखी कोणती योग्यता पाहून तत्कालीन सरकारने त्यांची शिक्षक म्हणून प्रतिमा उभी करून त्यांचा जन्म दिवस म्हणजे ०५ सप्टेंबर हा दिवस तमाम भारतीयांवर 'शिक्षक दिन' म्हणून  लादलेला आहे, याचे तर्कसंगत उत्तर आढळून येत नाही. असो !

'शिक्षक दिना' मागील सत्यता जाणून घेण्याच्या कुतुहलाने अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून  शोध घेतला असता एक आणि एकच गोष्ट अनेक संदर्भातून पुढे येते. तो म्हणजे राधाकृष्णन हे मनुवाद आणि वर्णव्यवस्था वर आधारित विषमतावादी वैदिक धर्म आणि संस्कृतीला प्रमाण मानणारे होते. आणि प्रचलित व्यवस्थेनुसार एवढेसे कारणच त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून जाहीर करण्याच्या निर्णयाला पुष्टी देणारी आहे.  

राधाकृष्णन यांच्या मते ‘मनुस्मृति म्हणजे एक धर्मशास्त्र  असून नैतिकतेची नियमावली आहे. ती वैदिक जीवन पद्धतीला मान्यता देते आणि जातीव्यवस्थेस ईश्वराचा आदेश मानते आणि  एकाग्र होऊन  शिक्षण ग्रहण करण्यासाठी केवळ  ब्राह्मणच पात्र आहेत, अशी मनुस्मृती आणि वर्णव्यवस्थेला प्रमाण मानणारी व्यक्ती फक्त वैदीक धर्माची प्रसारक असू शकते, शिक्षक नव्हे !

भले राधाकृष्णन यांनी काही काळ अध्यापनाचे काम केलेही असेल. पण त्या कालावधीत त्याबदल्यात त्यांना मोठा गलेलठ्ठ पगार मिळत होता. त्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेली ती निव्वळ एक नोकरी होती (सेवा अथवा शिक्षण प्रसार नव्हे) ते वैदिक धर्माचे खंदे पुरस्कर्ते आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे असल्याने त्यांची ओळख फार तर  एक प्रखर जातियवादी, जुनाट आणि अनिष्ट रूढी आणि परंपरा मानणारे, जोपासणारे हिंदू धर्म प्रचारक  अशीच करता येईल, शिक्षक म्हणून नव्हे !

एकूण काय तर आपल्या देशातील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राधाकृष्णन यांचा  काडी इतकाही संबंध नाही. एकच अपवाद म्हणजे  १९४८ मध्ये  त्यांची विद्यापीठ आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या वतीने केलेल्या शिफारशी देखील अप्रत्यक्षपणे मनुवाद जोपासण्यासाठी पोषक अशा जुन्या अनिष्ट रूढी आणि परंपरांचा पुरस्कार करणारे आणि भारताला अधोगतीकडे नेणारे असेच होते. कारण स्त्री शिक्षण आणि स्वातंत्र्याला त्या अहवालात अजिबात स्थान नव्हते.

ते  स्वतः स्त्री शिक्षण विरोधी होते.  त्यांनी आयुष्यभर वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. आपले साहित्य आणि आचरणातून यांनी सतत मनुवाद जोपासला. याउलट क्रांतीसुर्य 'महात्मा ज्योतिबा फुले'  यांचे  केवळ साहित्यच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बहुजन आणि विषमतावादी जाती व्यवस्थेत केवळ शिक्षणच नव्हे तर निसर्गदत्त  मूलभूत हक्कांपासून ही वंचित ठेवले गेलेल्या माणसात स्वाभिमान जागवण्यासाठी  व्यतित झाले आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून एकोणीसाव्या  शतकामध्ये एक क्रांतिकारक संदेश दिला तो म्हणजे, 

‘विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले... या महान संदेशाने  खूप मोठी क्रांती झाली आणि हजारो वर्षांपासूनचा  स्त्री जातीचा आक्रोश मातीत गाडायला सुरुवात झाली.

राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो. स्त्री शिक्षण आणि स्वातंत्र्याविषयी  त्यांचे विचार  ‘स्त्री आणि पुरुष समान मानले तरी त्यांंच्या कार्यक्षेत्रात अंतर असलेच पाहिजेत,  स्त्रियांनी  'सुमात्रा' आणि  'गृहिणी' याच मर्यादेत राहिले पाहिजे, असे होते. या उलट क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले मात्र अस्पृश्य आणि 'सर्व जातीय' स्त्री शिक्षणाचे कैवारी होते. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांची ही खरी ओळख आहे आणि ती खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमातून  बालवयापासूनच दिली गेली पाहिजे, परंतु असे होत नाही. शिक्षणातून नवा माणूस घडविला जातो. या मतावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यावर जोतिबा ठाम होते.

'गर्व से कहो हम हिंदू है 'असं म्हणणाऱ्या  कुणाही हिंदू धर्माधिकारी अथवा धर्म  प्रचारकाच्या  मनात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याची कल्पना आली नाही. येणार तर कशी ? 'पशू-गवार,ढोर-नारी सब है ताडन के हारी' हीच जर धर्माची शिकवण आणि नियम असेल तर राधाकृष्णन तरी यापासून दूर कसे राहू शकतात.

भारतात शिक्षण सार्वत्रिकीकरण करण्याचे सारे श्रेय खरे तर  इंग्रजांना द्यावे लागेल. जर असे झाले नसते तर केशव भट सारख्या  कर्मठ ब्राम्हणाने आततायीपणा करून गोविंदराव फुले यांना संपूर्ण फुले कुटुंबावर बहिष्कार करायची धमकी देऊन जोतिबाची शाळा सोडवली असताना महात्मा जोतिबा फुलेंना आपले शिक्षण पूर्ण करताच आले नसते. त्यांनी इंग्रज शासक असताना स्वतः शिक्षण घेतले आणि शिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यकता ओळखून ०१ जानेवारी १८४८ रोजी सर्व धर्मीय मुर्लींसाठी पहिली शाळा सुरू केली.

राधाकृष्णन यांचा अजून जन्मही झाला नव्हता. त्या अगोदर जवळपास चाळीस वर्षे आधी मुलीसाठी पहिली शाळा काढून शैक्षणिक क्रांती करणारे  जोतिबा फुले हेच खरे तर पहिले 'शिक्षक' आणि 'महात्मा' होत. शिकवायला कुणी येणार नाही, हे जाणून मुलींना शिकता यावे, यासाठी त्यांना  शिकवता यावे, म्हणून प्रथम त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षीत केले. आणि त्यांच्या सहाय्याने स्त्री शिक्षणाला सुरुवात केली.आणि नंतर  १८५१ ला  इथल्या विषमतावादी जातीव्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या बहुजन आणि वंचितांसाठी  शाळा सुरू केली. हे पाहता खऱ्या अर्थाने 'शिक्षक दिनाचे' हकदार  महामानव क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले हेच ठरतात.

शेकडो वर्षे वर्ण, वर्ग, जातिव्यवस्थेच्या बेड्यात बंदिस्त करण्यात आलेल्या  शूद्रातीशूद्र समाजाला व समस्त  स्त्रियांना स्वअस्तित्वाची जाणीव करून देणारा विद्रोही विचार या भूमीत प्रथम महात्मा फुले यांनी  रुजवला. स्त्री शिक्षण व स्त्रीमुक्ती तत्त्वज्ञानाचे दालन खऱ्या अर्थाने त्यांनीच उघडून बहुजन समाजातील शिक्षणाची चळवळ यशस्वी करण्याकडे लक्ष केंद्रित केले.

महात्मा  फुले यांनी सावित्रीमाईंना घेऊन भविष्याचा अचूक वेध घेऊन दूर दृष्टिकोनातून प्रस्थापित समाजव्यवस्थेने स्त्रिया, अस्पृश्य आणि  बहुजनांसाठी   बंद असलेले शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. हे आमूलाग्र परिवर्तन महात्मा फुलेंच्या चळवळीनेच शक्य झाले.

वर्ष १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे पुण्यातून एकूण आठ निवेदने सादर करण्यात आली. त्यात स्त्री शिक्षणासाठी आग्रही असलेले एकमेव निवेदन  महात्मा ज्योतिबा फुले  यांचे  होते. त्यांनी  कमिशनपुढे जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये  प्रामुख्याने शिक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडला. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत सर्व मुलामुलींसाठी सक्तीचे  व मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केली.

स्वत: महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई या दोघांनी पुढाकार घेऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली नसती तर आज  बहुजन समाज आणि विशेष करून सर्वधर्मीय महिलांची काय आणि कशी स्थिती राहिली असती, याचा तमाम सर्वधर्मीय महिलांनी ही अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

द्रोणाचार्य आणि राधाकृष्णन या दोघांमध्ये एक समान स्वार्थ आणि दुष्ट बुद्धी आहे, ती म्हणजे आपल्या क्षेत्रात आपल्याशिवाय अन्य कुणीही पारंगत असू नये. कुणाचेही नावलौकिक होता कामा नये. या करिता एकलव्याचा अंगठा मागणे आणि राधाकृष्णन यांची प्रबंध चोरी या दोन्ही घटना एकाच श्रेणीतील आहेत.

राधाकृष्णन यांनी आपल्या विद्यार्थ्याचा पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला होता. त्याविरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात एक खटला अत्यंत गाजला होता. अशा एक विशिष्ट कर्मठ धर्म प्रचारकाच्या नावाने 'शिक्षक दिन' साजरा करणे हा शिक्षण प्रसारासाठी संबंध आयुष्य व्यतीत करणारे  क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा अवमान तर आहेच. शिवाय त्यांच्या तत्वज्ञानानुसार चालणाऱ्या  तमाम आदर्शवादी शिक्षकांचा ही  घोर अवमान आहे. विशेषतः  देशात आणि शिक्षण क्षेत्रात यामुळे चुकीचा पायंडा पडला आहे आणि पडणार आहे, हे मात्र  नक्की !

शिक्षकांच्या अंगी कुठल्याही एका विशिष्ट जात अथवा धर्माविषयी ममत्वाची भावना अथवा धर्मांधता न राहता अखिल मानवतेच्या विकास आणि कल्याणाची तळमळ असावी. या कसोटीत क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले हे तंतोतंत बसतात, म्हणून त्यांचा जन्म दिवस म्हणजेच दर वर्षी अकरा एप्रिल हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करुन त्यांचा गौरव  करणे हे अधिक संयुक्तिक आणि न्यायसंगत ठरणार आहे इतकेच !

विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष, जन लेखक संघ, महाराष्ट्र.