संतप्त कुर्डूवाडीकरांचा बंद आंदोलनातून सवाल
कुर्डुवाडी/हर्षल बागल : शांततेमध्ये चाललेल्या मराठा उपोषण करणाऱ्या आंदोलकांवरती लाठीचार्ज व गोळीबार करण्याचा आदेश देणारा तो जनरल डायर अधिकारी कोण आहे? या संबंधित गृह विभागाने स्पष्ट करावे. एक नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीचे लेखी निवेदन प्रांत अधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने देण्यात आले.
सकल मराठा क्रांती मोर्चा कुर्डूवाडी व माढा तालुका वतीने रविवार रोजी कुर्डूवाडी शहर परिसर व तालुका बंद आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. या शहर बंद आंदोलनाला व्यापारी ,व्यावसायिक दुकानदार ,शेतकरी वर्गातून यशस्वी पाठिंबा मिळाल्यानंतर कुर्डूवाडी शहर व परिसर शंभर टक्के बंद दिसून आला. या बंदमध्ये सर्वपक्षीय नागरिक सर्व जाती धर्मातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी नऊ वाजता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन , राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , अहिल्या राणी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करित प्रांत अधिकारी कार्यालयावरती हजारो नागरिकांचा मोर्चा धडकला.
बंदमध्ये व मोर्चात ना कोणता झेंडा ना कोणता पक्ष !
कुर्डूवाडी शहर व परिसरात पाळण्यात आलेला बंद शंभर टक्के बंद दिसून आला सर्व महापुरुषांच्या स्मारकांना पुष्प अर्पण करून प्रांत अधिकारी कार्यालयावरती धडकलेल्या मोर्चाच्या मध्ये कोणत्याही नागरिकांच्या हातात कोणत्याही रंगाचा झेंडा नव्हता. आम्ही भारतीय म्हणून आम्ही माणसं म्हणून या मोर्चात सहभागी झाल्याची प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाची भावना होती.
पुढार्यांनी आपल्या पक्षाच्या चपला या मोर्चाच्या बाहेर सोडून मोर्चात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
....चौकट ....
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना लाठीचा जो गोळीबार चा आदेश कोणी दिला, तो सदर मंत्री व अधिकारी यांनी राजीनामा द्यावा, तसेच ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे पाठीमागे घेण्यात यावे व राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या लेखी निवेदनात करण्यात आले आहेत.