मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीत साडे आठ लाख रुपयांचे नुकसान

shivrajya patra
सोलापूर : मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीत सुमारे साडे आठ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे नुकसान झाले. ही घटना अशोक चौकात, २१ सप्टेंबर रोजी पहाटे १.०० वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी काल मध्यरात्री जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ही दुर्घटना वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरातील एम. आय. डी. सी.परिसरातील विठ्ठलनगर देवी मंदिर जवळ वास्तव्यास असलेले विशाल सोमनाथ तिम्मण (वय-२५ वर्षे, धंदा व्यवसाय) यांचं अशोक चौकात मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीचे दुकान आहे. २१ सप्टेंबरच्या पहाटे ०१ वा.सुमारास मोबाइलवर गाडपत्री याचा कॉल आल्याने बंद दुकानातून धूर येत असून तेथे आग लागल्याचे कळले. विशाल तिम्मण यांनी हा प्रकार त्यांचे मामा विजय गोसकी यांना कळविला.
तेव्हा मामा व मित्र परमेश्वर रच्चा, श्रीपाद पंडाल यांच्यासोबत अशोक चौक या ठिकाणी असलेल्या दुकानाकडे आले.

तेव्हा दुकानातून धूर येताना दिसला, ते दुकान उघडले असता, दुकानाला आग लागल्याचे दिसून आले, त्यांनी हा प्रकार फायरब्रिगेडला कॉल करून कळविला, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या दरम्यान बाजूला असलेल्या पतसंस्थेचे शिममधील पाणी बादलीने मारून आगीवर नियंत्रणात आली होती. त्यावेळी आलेल्या पोलिसांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली, मात्र दुकानात रात्रीचा अंधार असल्याने मोबाइल टॉर्चच्या उजेडात झालेल्या पाहणीत झालेल्या नुकसानीचा अंदाज येत नव्हता.

त्यामुळे सकाळी नुकसानीचा आढावा घेऊन तक्रार दाखल करतो, असे विशाल तिम्मण यांनी पोलिसांना कळविले. दुसऱ्या दिवशी नुकसानीचा आढावा घेतला, खालील प्रमाणे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात सुमारे पाऊणे चार लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज, रुपयाचे फर्निचर व ग्लास, पीओपी सिलिंग लाईट टयूब लाईट वायर फैन्स, सीसीटीव्ही कॅमेरा सेट हार्डडिस्क पावर सप्लाय, वायफाय डोंगल व स्टॅबिलायझर, एल. इ. डी. टीव्ही आणि एअरकंडीशनर वगैरे ८ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्घटना वीजेच्या शार्ट सर्किटमुळे घडली असल्याची माहिती विशाल तिम्मण यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद केलीय. पोहेकॉ कांबळे/१२५७ याचा अधिक तपास करीत आहेत.




To Top