बोरामणी : मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला सुरक्षित ठेवायचे असेल, आपले हक्क व अधिकार आबादीत ठेवायचे असेल, तर मराठा आरक्षणाची आज नितांत गरज आहे. हे आरक्षण मिळवायचे असेल तर नाकर्त्या राजकर्त्यांना खुर्चीवरून खाली ओढावे लागेल तरच मराठा समाजाला राजकारण मिळू शकेल, असा जळजळीत इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. राज साळुंखे यांनी दिला.
जालना येथे झालेल्या अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळी दहा वा. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत भव्य रस्ता रोको कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाने आजवर महाराष्ट्रात बापाची भूमिका बजावत सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारच्या अडचणी असतानाही कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका घेतली नाही. सनदशीर मार्गाने आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात झालेला लाठीहल्ला व बेछुट गोळीबार म्हणजे मराठा समाजाच्या न्याय व हक्कावर झालेला हल्ला आहे, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या माय बहिणींच्या अंगावरील प्रत्येक जखमेचा यांना हिशोब द्यावा लागेल, असेही डॉ. साळुंखे यांनी म्हटले.
लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचा आदर्श उभ्या जगाने घेतला, त्या समाजावर दगडफेकीचा आरोप म्हणजे आमच्या अस्मितेवर केलेला वार असून यापुढील काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करत आरक्षण मिळवल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक समाज घटकाने या आरपारच्या लढाईत स्वतःहून सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. साळुंखे यांनी केले.
मराठा आणि कुणबी मराठा अशा नव्या कोलत्या काढून दिशाहिन न करता सरसकट आरक्षण द्यावे, असा इशारा ही सरकारला देण्यात आला. आंदोलनात मराठा समाजाबरोबरच गावातील इतर समाजबांधवांनी ही प्रचंड सहभाग नोंदवला. या रास्ता रोको दरम्यान शाम भाऊ भोसले, प्रताप कांचन पाटील, सुनील नागणे, सुधाकर पाटोळे आदींनी आपली मनोगत व्यक्त केले.
रस्ता रोको दरम्यान मिलिटरी, अॅम्बुलन्स,व अति तातडीच्या सेवेला समाजाने सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आरक्षणासाठी काल माडज तालुका उमरगा येथील युवक शिवभक्त चंद्रकांत किसन माने यांनी आत्म बलिदान दिले. त्यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने रास्तारोको आंदोलनाचा समारोप झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या रास्तारोको साठी तालुका पोलिस उपनिरीक्षक इज्जतवार, बनसोडे, मोरे, बागवान, यांनी सुरक्षा पुरवत सहकार्य केले.यावेळी भारत कवडे, शाम भोसले, विकास भोसले, रतन शिंदे, बंडू मस्के, कमलाकर भोसले, पप्पू मस्के, सुनील नागणे, नाना भोसले, अमित मोरे, अतुल कवडे, योगेश भोसले, राहुल कवडे, राजकुमार वाघमारे, माणिक ननवरे, अभिमन्यू भगरे, सुशील उकरंडे, महादेव पाटील, कृष्णात मस्के, रफिक मुजावर, सुधाकर पाटोळे, दत्ता हब्बू, सतीश इंगळे, रवी रोकडे, राहुल वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता म्हणून मोठा बंदोबस्त लावला होता.