दुष्काळी परिस्थिती असताना बैठकीला उत्सवाचं रूप : जयंत पाटील

shivrajya patra
मुंबई : मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय, त्या पार्श्वभूमीवर आजची राज्य मंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे. पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे, असं राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय.

राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या संबंधी चिंता व्यक्त करताना, शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं, असेही पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही. 

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार, अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील, अशी आशा ही त्यांनी शेवटी व्यक्त केलीय.
To Top