वारकरी सांप्रदाय भारताची शान : जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी

shivrajya patra

सोलापूर : वारकरी सांप्रदाय भारताची शान आहे. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून होणारे वारकरी भवन प्रेरणादायी आणि वारकरी सांप्रदायाला दिशा देणारे ठरेल, असे विचार काशीपीठाचे जगद्गुरु १००८ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी मांडले.

सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील प्रभाग क्रमांक ६ मधील दमाणी नगर भागातील गड दर्शन सोसायटीच्या शेजारी असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या दहा हजार स्क्वेअर फुट जागेत साकारणाऱ्या वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी दुपारी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते तसेच पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार विजयकुमार देशमुख आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प .सुधाकर महाराज इंगळे तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने पार पडला. यावेळी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी बोलत होते.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी या वारकरी भवनासाठी १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. पंढरीचा वारकरी साक्षात पांडुरंग म्हणून भक्तांच्या सेवेला हजर होतो.  या वारकऱ्यांसाठी सोलापुरात होत असलेले वारकरी भवन सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे .आमदार विजयकुमार देशमुख यांनी समस्त वारकऱ्यांना दिलेला शब्द वारकरी भवनच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. त्यामुळे वारकरी भवन पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने याचे भव्य आणि दिव्य स्वरूप सर्वांसमोर येईल.तीन मजली वारकरी भवन असावे, अशी इच्छा व्यक्त करत वारकरी भवन हे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम ठरेल, असेही महास्वामी यावेळी बोलताना म्हणाले.

आजचा दिवस वारकऱ्यांच्या जीवनात सुवर्णाक्षराने  लिहिण्यासारखा दिवस आहे. वारकरी कधीही कोणतीही अपेक्षा करत नाही. परंतु वारकऱ्यांसाठी देणाऱ्याने तन-मन-धनाने पुढे आले पाहिजे, म्हणून आमदार विजयकुमार देशमुख वारकरी भवनासाठी पुढे सरसावले, आणि त्यांनी सव्वा कोटीचा निधी वारकरी भवनाला दिला, असे गौरवोद्गार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प .गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले.

ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे ऋण व्यक्त करत वारकरी भवनाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेला हातभार लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नव्याने साकारण्यात येणारे हे वारकरी भवन अत्याधुनिक पद्धतीचे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. सुरुवातीपासूनच वारकरी भवन नेमके कसा असावे, याबाबत विचार विनिमय करूनच या वारकरी भवनाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसेच अन्य उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे ह. भ .प. सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले. स्थायी समितीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनीही वारकरी भवनासाठी सर्वतोपरी आणखी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण देशमुख,संजय कोळी, ज्योतीराम चांगभले, भागवत महाराज चवरे ,जगन्नाथ देशमुख महाराज, मोहन शेळके, लहू गायकवाड, रेखाताई गायकवाड ,सुनील खटके,किसन कापसे, बसवेश्वर जाधव, सुरेश पोखरकर, नागेश खरात, शिवदास चटके सर, किरण पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर नागनाथ पाटील यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.
 ------------------------------------
वारकरी , साक्षात विठ्ठलच
-------------------------------------
 पंढरीचा वारकरी हा केवळ वारकरी नव्हे, तर साक्षात पंढरीचा श्री विठ्ठलच आहे. वारकरी भवनच्या माध्यमातून श्री विठ्ठलाची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. सध्या १० हजार स्क्वेअर फुट जागेत होत असलेले वारकरी भवन आणखी भव्य आणि दिव्य होण्यासाठी निधीसह जागेची सुद्धा कमतरता पडू देणार नाही. हे वारकरी भवन मूर्तीमंत उदाहरण ठरेल.
 - विजयकुमार देशमुख - आमदार
------------------------------------
 अमोल शिंदे यांचा वारकरी भवनला २५ लाखांचा निधी
----------------------------------
 वारकऱ्यांसाठी दमानी नगर भागात वारकरी भवन होण्यासाठी सव्वा कोटीचा निधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. वारकरी भवनाचे प्रवेशद्वार आणि अन्य विकास कामांसाठी आपण २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी यावेळी केली. १० हजार स्क्वेअर फुट जागा कमी पडते. त्यामुळे या ठिकाणी शिल्लक असलेली सर्व जागा वारकरी भवनासाठी घेऊन देखणे वारकरी भवन होण्यासाठी आपण प्रयत्न करू ,असेही अमोल शिंदे म्हणाले.
-----------------------------------
To Top