रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे महामार्ग तासभर ठप्प
सोलापूर : जालना येथील मराठा समाज अत्यंत शांततेत संविधानिक मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीहल्ला केला. त्यात अनेक महिला व लहान मुलं तसेच वयोवृद्ध जखमी झाले. त्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाज जिथे-तिथे रस्त्यावर उतरला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे ओव्हर ब्रिजवर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या 'रास्ता रोको' मुळे वाहतूक जवळपास तासभर रोखण्यात आल्याने थांबलेल्या वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' करीत आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त होत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरावली-सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर-पुणे मार्गावरील बाळे ओव्हर ब्रिज, होटगी रस्त्यावरील आसरा चौक, हैदराबाद रस्त्यावरील दोड्डी फाटा, अक्कलकोट रस्त्यावर कर्देहळ्ळी फाटा, तुळजापूर रस्त्यावर ऊळेगांव येथील राष्ट्रमाता जिजाऊ ओव्हर ब्रिज येथेही सकाळी ११ वाजता सुमारास रास्ता रोको आंदोलन करून त्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी निदर्शने-आंदोलने सुरूच आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या एकमेव मागणीसाठी अंतरावली-सराटी येथे शांततामय वातावरणात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी व परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून भय आणि तणावाचं वातावरण निर्माण करण्यात आले. लाठीहल्ल्याला जबाबदार असलेले पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या अमानुष घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध ठिकाणच्या आंदोलनात जोरदारपणे करण्यात आलीय.
त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे महामार्गावरील बाळे ओव्हर ब्रिजवर सकल मराठा समाज च्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या समाज बांधवांनी 'जय जिजाऊ, जय शिवराय' 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', 'मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्यावरील संतापाला वाट मोकळी करून दिली.आंदोलनकर्त्यांचा रोष पराकोटीचा असल्याने काही ठिकाणच्या आंदोलनात त्यांच्या प्रतिमेला 'जोडे ' मारून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.
होटगी रस्त्यावर संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड व हद्दवाढ भागातील मराठा समाज च्या वतीने आसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी श्याम कदम, विशाल ताकमोगे, अरविंद शेळके, सिताराम बाबा, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आसरा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.