डी.जे. मुक्त उत्सवासाठी पोलीस आयुक्तांना देण्यात येईल निवेदन : विष्णू कारमपुरी

shivrajya patra
सोलापूर : आगामी काळात डी.जे. मुक्त उत्सव व मिरवणुका झाले पाहिजे, यासाठी श्री पद्मसूर्य प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना भेट घेऊन वरील मागणीची निवेदन देण्यात येईल, अशी घोषणा पद्मसूर्य प्रतिष्ठानचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांनी प्रतिष्ठानच्या वतीने उत्सव व मिरवणूक शांततेसाठी झालेल्या बैठकीत बोलताना केली.

सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असल्याची सर्व दूर ख्याती आहे. इथे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात व आनंदात शांततेत पार पाडले जातात. परंतु गेल्या काही कालावधीपासून विविध समाजाचे रथोत्सव, राष्ट्रीय पुरुषाची जयंती व पुण्यतिथी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती यासह इतर मोठ्या उत्सवाच्या मिरवणुका निघतात. या मिरवणुकात लावण्यात येणाऱ्या डी.जे. साऊंड सिस्टममुळे समाजकंटक अशांतता व गोंधळ घालण्यास यशस्वी होताना दिसून येते, ती अशांतता आणि गोंधळ टाळण्यासाठीच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी पद्मसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

श्री मार्कंडेय रथोत्सवात भांडणे, मारामारी, गोंधळ, झालाच कसा, याविषयी सखोल माहिती घेऊन यापुढे कुठल्याही उत्साहात अशी गडबड अथवा गोंधळ होऊ नये, याबाबत चर्चा करण्यासाठी कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे बैठक आयोजित करण्यात आली, सदर बैठकीत विष्णू कारमपुरी यांनी वरील घोषणा केली.

बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक पद्मसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय यांनी केले. यानंतर बैठकीत उपस्थित सर्व सामाजिक, सार्वजनिक कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या.या सूचनांमध्ये विशेष करून डीजे व डिजिटल बोर्ड यावर बंदी आणावी तर सर्व उत्सव व मिरवणुका शांततेत पार पडतील, अशा सूचना पुढे आल्या.

कुठलेही उत्सव साजरा करताना त्यांची संपूर्ण जबाबदारी ही संयोजकाची असते. त्यानंतर पोलिसांची मदत अपेक्षित असते, परंतु मिरवणुकांचे नियोजन आयोजकांकडून झाल्याचे दिसून येत नाही, म्हणून समाजकंटक त्यांचा उद्देश साध्य करून उत्सवात गोंधळ घालतात, याबाबत समाजाचा एक घटक म्हणून सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न करावे, तो करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन विष्णू कारमपुरी यांनी केले.

आपल्या पद्मसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वरील विषयावर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अनिल दंडगुळे, सुरेश शिंदे ,जर्गीस मुल्ला, यांनी आपले विचार व्यक्त केले.

विष्णू कारापुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राहुल गुजर, विठ्ठल कुराडकर, जर्जिस मुल्ला, प्रभाकर मेघड्याल, सुरेश गोरंटला ,विशाल महिले, श्रीकांत कुसुरकर,गणेश  यरगुंडला, शरद गोगी, दशरथ नंदाल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ _____
पद्मासूर्य प्रतिष्ठानच्या वतीने उत्सव शांतता या बैठकीत मार्गदर्शन करताना विष्णू कारमपुरी, व्यासपीठावर विजय नीली, अनिल दंडगुळे, विठ्ठल कुराडकर व समोर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते दिसत आहेत.
To Top