शिक्षक दिन की दीन शिक्षक ?

shivrajya patra

 
विशेष लेख...
०५ सप्टेंबरला पूर्ण भारतभर शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. त्या दिवशी मला माझ्या एका आदर्श शिक्षक मित्राची आठवण झाली. अशोक सोपान ढोले सर...!  ज्यांच्या विषयी आज महाराष्ट्र भर चर्चा सुरू आहे.

यात काय विशेष ? असे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल.. थांबा सांगतो...! त्यांचा थक्क करणारा व तरूणाईला प्रेरणादायी जीवन प्रवास तुम्हाला सांगायलाच हवा म्हणून हा विशेष लेख !

अशोक ढोले सर हे पुण्यातील प्रसिद्ध सिंबायोसिस कॉलेज मधील प्राध्यापक आहेत, ज्यांनी १८ वर्षे निष्कलंक सेवा केली आहे. १२ वीच्या वर्गात अध्यापन करत असताना एका विद्यार्थ्याने आपल्या वैयक्तिक रागापोटी  सरांच्या अध्यापनाचा ३ मिनिटांच्या अर्धवट व्हिडिओ रेकॉर्ड करून तो हिंदू संघटनेला पाठवला.  त्या आधारे धार्मिक भावना दुखावल्या, म्हणून तथाकथित हिंदू संघटनांनी आंदोलने करून सरांना टार्गेट केले.

या संघटनांनी मुद्द्याच्या मुळाशी न जाता कॉलेजवर आणि पोलीस स्टेशन समोर प्रचंड आंदोलने करून दबाव आणून त्यांच्यावर २९५ अ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडीही भोगावी लागली. कॉलेजनेही त्यांना सेवेतून निलंबित केले असून चौकशी समिती स्थापन केली आहे. यानिमित्ताने धार्मिक राष्ट्रवादी लोकांनी एका अत्यंत चारित्र्य संपन्न.... अत्यंत हुशार... अत्यंत कर्तुत्व संपन्न.... आदर्श शिक्षकाचा कळत न कळत बळी घेतला आहे.....!

ढोले सर चूक की बरोबर हे आपण आधी पाहू मग ढोले सरांनी स्वतःला आजपर्यंत कसे घडवले याविषयी त्यांचा खडतर जीवन प्रवास पाहुयात ...!

हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी तरुण एकत्र येताहेत..आक्रमक होताहेत, हे चांगले लक्षण असले तरी कधी कुणी आपल्या वैयक्तिक रागापायी व स्वार्थापोटी  एका शिक्षकाच्या अध्यापनाचा बेकायदेशीर अर्धवट व्हिडीओ काढून त्यातील काही भाग सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये जाणीव पूर्वक प्रसारित करून एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जिवनात प्रचंड मनस्ताप... मानहानी.... वादळ निर्माण करतो आहे, हे कितपत योग्य आहे ?

असाच प्रकार ढोले सर यांच्या बाबतीत घडला... ढोले सर पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये हिंदी विषय शिकवतात.... ते अतिशय शिस्तप्रिय असल्याने कॉलेज मधील शिस्त पालन समितीचे सदस्य आहेत. अनेक वाट चुकणाऱ्या मुलांच्या पालकांशी संवाद साधत मुलांना शिस्त लावण्याचे काम ते करतात. अशाच काही  नाराज विद्यार्थ्यांनी सरांची बदनामी कारण्यासाठी वर्गात शिकविताना ४५ मिनिटांच्या लेक्चर मधील फक्त तीन मिनिटांचा अर्धवट व्हिडिओ काढून मुद्दाम हिंदू संघटनांना पोहोच केला आणि मग पुढचे महाभारत घडवून आणले....!

वीडिओमधे सर १२ वीच्या मुलांना भक्ती रस प्रकरण  शिकविताना ईश्वर एकच आहे .... ईश्वराची अनेक रूपे असली तरी अनन्य भक्ती चे महत्व सांगताना नेहमीच्या ऐकण्यातील लोककथा सांगताना दिसत आहेत. ती लोककथा अशी.."एकदा तीन लोक बोटीतून प्रवास करताना वादळ आल्याने बोट पाण्यामध्ये बुडू लागते, तेव्हा ते  लोक आपापल्या देवांचा धावा करतात... अल्लाह... येशू येऊन आपापल्या भक्ताला वाचवतात... मात्र त्यातील एक व्यक्ती एक एक करून राम.. सिता...हनुमान... शंकर या सगळ्या देवांचा धावा करतो,  त्यामुळे प्रत्येक देवाला वाटते दुसरा जाईल व याला वाचवेल आणि तो व्यक्ती बुडतो.! याच व्हिडिओमध्ये सर पुढे असे ही म्हणतात, की ईश्वर हा एकच आहे. आपण  कोणत्याही आपल्या इष्ट देवतेची भक्ती केल्यास आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होईल. बस... एव्हढा अर्धवट व्हिडिओ मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये प्रसाद केला याच्या आधीचे व नंतरचे कोणतेही संदर्भ, स्पष्टीकरण व विश्लेषण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेले नाहीत.  

४५ मिनिटांच्या लेक्चर मधील एवढाच तीन मिनिटांचा व्हिडिओ पाहून या शिक्षकांना हिंदू धर्म विरोधी ठरवून उत्साही हिंदू संघटनानी प्रचंड आंदोलन उभे करून, मीडियाने बेजबाबदारपणे वृत्तांकन करून एका निष्कलंक शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काय चुकले त्यांचे ? किती जणांना हिंदू धर्मांतील अनन्य भक्ती  तत्वज्ञान माहीत आहे....! स्वतः श्री कृष्ण गितेत सांगतात...
       "सर्व  धर्मांनपरित्यज्य... मामकेम शरणम् व्रज...!अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष्ययिष्यामी मा शुच...!
सगळे कर्म मला अर्पण करून सर्व इतर मार्ग सोडून मला एकाला अनन्य भावाने शरण ये... मी तुला सर्व पापातून मुक्त करतो व मोक्ष प्राप्त करून देतो.....!

ज्ञानेश्वरीत पण ज्ञानेश्वरांनी रोज नवीन भाव धरून एका नवीन देवतेला भजनाऱ्या व्यक्तींची अतिशय कठोर शब्दांत कान उघडणी केली आहे.. संत तुकाराम... संत एकनाथ...  सारे जे सांगून गेले, तेच ढोले सरांनी सांगितले...! वास्तविक सर्वत्र एकच चैतन्य विराजमान आहे, त्यामुळं 'इष्ट देवते' ची शरणागत निस्सीम भक्ती करण्यास आपले वेद... गीता... पुराण.... उपनिषदातील तत्वज्ञान शिकवते....!

परंतु पुण्यातील स्थानिक समस्त हिंदू बांधव सामाजिक संघटनेने मागचा पुढचा संदर्भ न अभ्यासता.. प्रसिध्दी व स्टंट बाजीच्या उत्साहात आंदोलन करून आपल्याच हिंदू बांधवावर गुन्हा दाखल करून अटक करवून आपलेच हिन्दू धर्म तत्वज्ञान पायदळी तुडवले व स्वतः चे  हिन्दू धर्माबद्दलचे अज्ञान दाखवून दिले असे म्हणता येईल....!

असो त्या संघटनांनी अजूनही अभ्यास करून सत्य मान्य केले तर संघटनेची कोर्टात होणारी शोभा होणार नाही.....! भगवान श्री कृष्ण त्यांना सद्बुद्धी देतील अशी आशा करतो...!

पण यातून पुन्हा तेच काही प्रश्न गंभीरपणे समोर आले ...!
१) एखादा अर्धवट वीडियो पाहून एखाद्या विद्वान व्यक्तीला कोणतीही खात्री अभ्यास न करता इतकं टॉर्चर करणं योग्य आहे का ?
२) शिक्षकांनी शिकवताना आता फक्त पुस्तक वाचून दाखवायचे का ? मुलांना समजेल असे समाजातील   उदाहरण द्यायचे नाही का ?
३) इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या टीआरपी साठी कुठपर्यंत पातळी खाली आणावी याला मर्यादा घालणे आवश्यक झाले आहे की नाही...?
४) शिक्षकांना काही स्वातंत्र्य.. आदर... चांगली वागणुक आपण देणार आहोत की नाही ?
५) आपला हिन्दू लोकं उत्साहात मूळ सनातन तत्वज्ञान विसरत तर नाहित  ना ? त्यासाठी समाजाला काय करावे लागेल?

या सर्व प्रश्नांची उत्तरेही समाजाने स्वतःच शोधायची आहेत....

मी, आमचे मित्र आणि जे लोक ढोले सरांना व्यक्तिशः ओळखतात, त्यातील प्रत्येक जण त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. आमची सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावयाची ही तयारी आहे. ढोले सर आज ना उद्या यातून नक्कीच निर्दोष सूटतील याची खात्री आहेच... !
                            
कोण आहेत अशोक ढोले सर.....?
अशोक ढोले सरांचा प्रेरणादायी जीवन प्रवास बघुया ...!
(अशोक ढोले सर माझे मित्र असल्याकारणाने यापुढे मी त्यांचा एकेरी उल्लेख करत आहे.)

अशोक, शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रूक या गावी वंजारी समाजात ऊस तोडणी कामगाराच्या पोटी जन्माला आला....! घरात अठरा आयुष्य दारिद्र्य, त्यातच अशोक चौथी मधे असताना वयाच्या ९ व्या वर्षी आई जग सोडून गेली....!

त्याच वर्षी अशोकचे व्यसनी वडील तीन लेकरांना वाऱ्यावर सोडून गुजरातला निघून गेले...!
५ ते ७ वी चे शिक्षण आजीने केले व त्याचा सांभाळ केला. नंतर आजीकडील शाळेत पुढील शिक्षण नसल्यामुळे त्याला पुन्हा गावी यावे लागले.  बहिण लग्न होऊन गेली... भाऊ लग्न करून ऊस तोडणीच्या कामासाठी सासरवाडीला निघून गेला. अशोक शेतातील छपराच्या घरात एकटाच राहिला, ना कोणी शेजारी, ना कोणी सोबतील.. ...! ८ वी ते १२ वी हे शिक्षण अशोक ने सुट्टीच्या दिवशी गवंड्याच्या हाताखाली काम करून ... दुसऱ्याच्या शेतात खुरपनी करून... पाईप लाईन चे खोदकाम करून मिळालेल्या पैशातून एकटा राहून स्वतः स्वयंपाक करून कशी-बशी पोटाची खळगी भरून पूर्ण केले..! 

बी. ए. चे शिक्षण घेत असताना अशोकचा आणि माझा  संबंध आला, आमची घट्ट मैत्री झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, शेवगांव येथे आम्ही एकाच रूममध्ये  राहिलो. हे  वसतिगृह म्हणजे आम्हा गरीब विद्यार्थ्यांचे माहेरघरच. खूप हालाखीच्या परिस्थितीत अशोकने या ठिकाणी तीन वर्षे शिक्षण घेतले, परंतु त्याचा आत्मविश्वास कधी ढळला नाही. .कारण आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे ऊर्जा स्थान आपले थोर महापुरुष  होत. 

बी.ए. झाल्यानंतर एम.ए. करण्यासाठी अशोक पुणे विद्यापीठात गेला.  घरून कोणी पैसे देणारे नव्हतेच  म्हणून स्वस्तात रूम करण्यासाठी कॉलेज पासून  लोहगावमध्ये सुमारे २५ किलोमीटर अंतरावर रूम केली. स्वतः ला सायकल नसल्याने मित्राची सायकल व मित्राला डबल सीट बसवून रोज पंचवीस किलोमीटर जाऊन परत यायचे असा दिनक्रम सुरू होता. जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले...!

बीए झाल्यावर उन्हाळी सुट्टीत काम करून साचलेले पैसे आता संपत आले होते. दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी भुक्यापोटी झोप येत नाही, म्हणून एक वडा -पाव खाऊन झोपत होता. मित्रांकडून घेतलेले उसने पैसेही आता संपले होते. आपले शिक्षण पूर्ण करायचेच या जिद्दीने अशोकने सिक्युरिटी गार्डची नोकरी स्वीकारली. महिना १८०० रुपये. रात्री ११ ते सकाळी ०७ ड्युटी करून दिवसा १० ते ३ कॉलेज, नंतर ३ ते ५ या वेळेमध्ये 'कमवा-शिकवा' मधे काम केले. 

त्याने पुण्यामध्ये तीन वर्षे सिक्युरिटी गार्डचे काम करून एम.ए. बी.एड पूर्ण केले. एम. ए. करत असताना सरांनी ज्या सिंबायोसिस कॉलेजच्या गेटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून गेट उघडण्याचे काम केले, त्याच सिम्बॉयसिस कॉलेजवर वयाच्या पंचविसाव्या वर्षी कोणतीही ओळख व वशिला नसताना आपल्या प्रतिभेच्या जोरावर  प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा मान त्याला मिळाला. यासारखा दुसरा तो कोणता सन्मान असू शकतो? 

परंतु त्याने आतापर्यंत या सगळ्याचे कधी भांडवल केले नाही आणि करणार ही नाही. म्हणूनच त्याची संमती न घेता आमच्यामधील असणाऱ्या घट्ट मित्रत्वाच्या नात्यामुळे मी त्याचा जीवन प्रवास आपल्यासमोर ठेवला आहे. एक सुशिक्षित आणि सत्याची साथ देणारा समाज म्हणून आपणही अशा विद्वान आणि आदर्श असणाऱ्या शिक्षकाला त्याच्यावर आलेल्या वाईट प्रसंगी काहीतरी मदत करावी व व्यक्त व्हावे, हाच या मागचा एक प्रामाणिक हेतू ! 
म्हणून हा लेख प्रपंच...!
 

.................
डॉ. अरूण ताराचंद भिसे
सिताई हॉस्पीटल, बोधेगाव,
ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर.
9860705055
To Top